अदानी कर लादल्यामुळे मुंबईकरांवर आर्थिक ताण, कचरा शुल्कावरून आदित्य ठाकरे यांचं पालिका आयुक्तांना खरमरीत पत्र

मुंबई शहरातील सामान्य नागरिकांवर आधीच विविध कर आणि शुल्कांचा भार आहे, त्यातच आता अजून एक अदानी कर लादल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे, असं म्हणत शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिलं आहे. मुंबईकरांवर कचरा संकलन व वापरकर्ता शुल्क लावण्याकरीता मुंबई महापालिकेने नवीन नियमावली तयारी केली आहे. मुंबईकरांकडून कचरा संकलन व वापरकर्ता शुल्क हे मालमत्ता कराचा भाग म्हणून वसूल केले जाणार आहे. याच संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. मुंबईतील नागरिकांवर घनकचरा वापरकर्ता शुल्क लागू करू नये, अशी मागणी त्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.

आपल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “घनकचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट यावरील वाढत्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी महानगरपालिकेने नागरिकांकडून वापरकर्ता शुल्क (user fee) वसुल करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, सध्याच्या महागाईच्या परिस्थितीत, मुंबई शहरातील सामान्य नागरिकांवर आधीच विविध कर आणि शुल्कांचा भार आहे, त्यातच हा अजून एक अदानी कर लादल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या कराचा आम्ही कडाडून विरोध करू. हा वापरकर्ता शुल्क मुंबईतील नागरिकांवर लावण्यात येऊ नये, ही विनंती.”