वरळी कोळीवाड्यातील जेट्ट्यांच्या पुर्नबांधणीसाठी तातडीने निधी मंजूर करा, आदित्य ठाकरे यांचे अजित पवारांना पत्र

वरळी कोळीवाड्यांमधील जेट्ट्यांची दुरवस्था झाली असल्याने कोळी बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांची गैरसोय दूर होण्यासाठी येथील जेट्ट्यांची पुर्नबांधणी करण्याकरिता तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे, नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांना केली आहे. त्यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी स्वतः X वर एक पोस्ट करत दिली आहे.

अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “वरळी कोळीवाडा परिसरातील क्लिव्हलॅण्ड बंदर जेट्टी, बत्तेरी जेट्टी, श्री. बंदरकर जेट्टी, विकास गल्ली, क्रांती लेन, तरे गल्ली व नवनीत चौक येथील जेट्ट्या सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून जेट्टींचे संरचनात्मक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे त्यामुळे स्थानिक कोळी समाजाला माशांच्या ने-आणीत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्यांचे दैनंदिन उपजीविकेबर गंभीर परिणाम होत आहे. या भागातील स्थानिक रहिवाशांनाही अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे तरी यांची तातडीने पुर्नबांधणी करणे गरजेचे आहे. या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन बे‌ट्टीच्या पुनर्बाधणीसाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा”, अशी मागणी त्यांनी केली.