आदित्य ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर येत असून ते अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना विभागीय नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर हे असणार आहेत.

चार दिवसांपासून मराठवाडय़ात पावसाने धुमशान घातले असून 12 लाख हेक्टरांवरील खरीप पिकांची नासाडी झाली आहे. अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आदित्य ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजता आदित्य ठाकरे यांचे छत्रपती संभाजीनगरात आगमन होणार असून तेथून ते पाचोड येथे पाहणी करण्यासाठी जातील. त्यानंतर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथील नुकसानीची ते पाहणी करणार आहेत.

असा आहे दौरा…

सकाळी 11 वाजता पैठण तालुक्यातील पाचोड येथे पाहणी करून आदित्य ठाकरे हे जालना जिल्हय़ाकडे रवाना होतील. सकाळी 11.45 वाजता अंबडगाव, त्यानंतर दुपारी 1 वाजता मंठा तालुक्यातील पांगरी येथे पाहणी करून ते परभणी जिल्हय़ाकडे रवाना होतील. दुपारी 2 वाजता पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण आणि त्यानंतर मानवत तालुक्यातील वझूर येथे दुपारी 2.45 वाजता पाहणी करून हिंगोली जिल्हय़ाकडे रवाना होतील. दुपारी 4.30 वाजता डोंगरगाव पूल, कळमनुरी आणि त्यानंतर सायंकाळी 5.45 वाजता नांदेड जिल्हय़ातील कासारखेडा येथे पाहणी करतील.