दक्षिण मध्य मुंबईत आजपासून सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सव, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

दक्षिण मध्य मुंबईतील कला व क्रीडाप्रेमींसाठी अनोखी पर्वणी आहे. शिवसेनेतर्फे 18 जानेवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीत मतदारसंघात सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या महोत्सवाचा भव्य शुभारंभ होणार आहे.

शिवसेना नेते आणि दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा व उपक्रमांचा समावेश असलेला हा महोत्सव क्रीडा व सांस्कृतिक प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. क्रिकेट (पुरुष), क्रिकेट (महिला), फुटबॉल, खो-खो, कुस्ती, टेबल टेनिस, पॅरम, रस्सीखेच, पंजा, बुद्धिबळ, कबड्डी, जिमनॅस्टीक्स, मल्लखांब, योगासने, दहीहंडी तसेच चित्रकला स्पर्धा आणि बरेच काही यामध्ये सामील आहे. स्पर्धेत विजेत्यांसाठी एकूण 11 लाख रुपयांच्या रोख बक्षिसांची घोषणा केली आहे. इच्छुक स्पर्धकांनी नावनोंदणी करणे अनिवार्य असून ते दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. महोत्सवाच्या उद्घाटनावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, आमदार अॅड. अनिल परब, मुंबई रणजी ओपनिंग बॅट्समन आयुष म्हात्रेदेखील उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात दक्षिण मध्य मुंबईतील क्रीडाप्रेमींनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार अनिल देसाई यांनी केले आहे.

स्पर्धेचा कालावधी व ठिकाणे

– रस्सीखेच ः 18 जानेवारी, दुपारी 3 ते संध्याकाळी 7ः30, श्री समर्थ व्यायाम मंदिर, शिवाजी पार्क. खो-खो ः 18 जानेवारी, सकाळी 9 ते रात्री 9, शिवाजी पार्क.

– मल्लखांब/जिम्नॅस्टिक्स ः 25 जानेवारी, सकाळी 9 ते रात्री 9, गोपीनाथ मुंडे क्रीडा मैदान, चेंबूर. फुटबॉलः 26 जानेवारी, सकाळी 9 ते रात्री 9, सेंट सेबॅस्टियन स्कूल टर्फ, चेंबूर.

– कुस्ती, पंजाः 2 फेब्रुवारी, सकाळी 9 ते रात्री 9, धारावी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स. चित्रकला स्पर्धा ः 2 फेब्रुवारी, संध्याकाळी 4 वाजता, माहीम, चेंबूर, वडाळा.

– क्रिकेट (महिला)ः 9 फेब्रुवारी, स्व. मनोहर जोशी विद्यालय, धारावी. पॅरम, बुद्धिबळः 9 फेब्रुवारी, शारदा मंगल कार्यालय, दादर. दहीहंडीः 9 फेब्रुवारी, सदाकांत ढवण मैदान, नायगाव.

– क्रिकेट (पुरुष)ः 15-16 फेब्रुवारी, शीव कोळीवाडा. बॅडमिंटनः 15-16 फेब्रुवारी,सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, चेंबूर. कबड्डीः 15-16 फेब्रुवारी, सदाकांत ढवण मैदान, नायगाव.