एक राज्य, अन् एक’ही गणवेश नाही! आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर निशाणा

महायुती सरकारच्या काळात राज्याची सर्व क्षेत्रात पीछेहाट झाली आहे. राज्यातील उद्योग इतर राज्यात जात आहेत. शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईने होरपळत आहे. महायुती सरकारने रस्ते घोटाळ्यापासून डांबरापर्यंत अनेक घोटाळे केले आहेत. त्यांच्या या घोटाळ्यातून शालेय विद्यार्थीही सुटले नाहीत. या सरकारने वर्ष संपायला आले तरी विद्यार्थ्यांना गणवेशाचा पत्ता नाही, या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एक राज्य, अन एक’ही गणवेश नाही! वर्ष संपायला आलं तरी गणवेशाचा पत्ता नाही! विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित ठेवण्यास एकनाथ शिंदे यांच्या भ्रष्ट राजवटीचे तत्कालीन मंत्री दीपक केसरकर जबाबदार आहेत. हे निर्लज्ज राजकारणी त्यांच्या अनियमिततेच्या यादीतून शाळेचा गणवेशही सोडत नाहीत. किती लाज वाटते!, असे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

एक राज्य, एक गणवेशाचे आश्वासन होते मोठे, वर्ष संपेपर्यंत ठरले खोटे! बुलढाणा जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप एकही गणवेश मिळालेला नाही. असे म्हणत शिवसेनेनेही बुलढाणा जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थांना वर्ष संपत आले तरी अद्याप एकही गणवेश मिळालेला नाही, याकडे लक्ष वेधले आहे.