नागपूरमध्ये जो न्याय लावला तसं मवाल्यांकडून सरकार नुकसान भरपाई घेणार का? कुणाल कामरा प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांचा निशाणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांवर निशाणा साधला. कुणाल कामराने कोणाला उद्देशून गाणं म्हटलं हे जगजाहीर झालेलं आणि जी तोडफोड केलेली आहे. त्याहून जास्त गंभीर म्हणजे एकनाथ मिंधेंच्या खासदाराने त्यांची साप म्हणून तुलना केली आहे. पक्षातल्या पक्षात त्यांची अशी हिंमत झाली असेल तर आता काय बोलायचं? त्यांचे खासदार त्यांची साप म्हणून तुलना करतात हे अजून गंभीर आहे, असा जोरदार टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

ज्या कोणी तोडफोड केली आहे त्यांचे चेहरेही दिसताहेत. तिथे पोलीस निरीक्षकही दिसत आहेत. पहिले पोलिसांना विचारलं पाहिजे की तुम्ही नक्की तिथे करत काय होतात? साधारणपणे नागपूरमध्ये जो न्याय लावलेला आहे ज्यांनी तोडफोड त्यांच्याकडून नुकसान भरपाईचे पैसे घ्यायलाच पाहिजे. तसे तोडफोड करणारे जे मवाली चेहरे दिसताहेत त्यांच्याकडून सरकार नुकसान भरपाई घेणार का? नाहीतर अशी तोडफोड करणं या राज्यात योग्य आहे, असा मेसेज मुख्यमंत्र्यांकडून देशात जाईल, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

कुणाल कामराने एक्सवर पोस्ट केला नवा व्हिडिओ, हम होंगे कंगाल एक दिन… या गाण्यातून मिंध्यांना पुन्हा डिवचलं

एक उपमुख्यमंत्री पण गद्दार बोलले आहेत. 33 देशांमध्ये त्यांची गद्दार म्हणून नोंद झालेली आहे. त्यांच्यावर एका कॉमेडियनने गद्दार म्हणून गाणं लिहिलं तर लगेच जाऊन तोडफोड होते. आणि मुख्यमंत्री महोदयपण त्याला पाठबळ देतात. दुसऱ्या बाजूला कोश्यारी, कोरटकर, सोलापूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरल्यानंतर भाजपकडून किंवा या बाकीच्या टोळ्यांकडून कुठेही उद्रेक होत नाही. ही हैराण करण्यासारखी गोष्ट आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.