छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघनखं असल्याचा दावा करून राज्य सरकारने ती लंडनहून मुंबईत आणली आहेत. ही वाघनखे आणायला सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे लंडनला गेले होते. त्यांचा हा युकै दौरा हा जनतेच्या पैशातून झाला असून त्याची भरपाई ते स्वत:च्या खिशातून करदात्यांना देणार का? असा सवाल शिवनसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच तसे न केल्यास त्यांचा हा युके दौरा देखील एक घोटाळाच असेल अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
”ती वाघनखं महाराजांनी वापरलेली आहेत का ते आधी त्यांनी सांगावं. नक्कीच ती शिवकालीन असू शकतात. मुनगंटीवारांनी मागच्या वर्षी दहा दिवसांचा युकेला एक आराम दौरा काढला होता. जनतेच्या पैशातून त्यांनी हा दौरा केला होता. या दौऱ्यासाठी जनतेचा जो पैसा खर्च झालाय त्याची भरपाई स्वत:च्या खिशातून ते करणार आहेत का? तो आम्हा टॅक्सपेयरला देणार आहेत का? नाहीतर हा देखील एक मोठा घोटाळा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या लाडका भाऊ या योजनेवरून देखील त्यांना फटकारले आहे. ”या योजना म्हणजे सरकारचा निवडणूकीचा जुमला आहे. पहिलं तर सरकारने पूर्ण एक वर्षाचे पैसे द्यावे. कारण सरकारवर आता कुणाचा विश्वास राहिलेला नाही. हे सगळे स्टायपँड फक्त स्किल्ड विद्यार्थ्यांनाच दिले जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशा वर्कर, आंगणवाडी सेविका यांना देखील पैसे द्या. ओल्ड पेन्शन स्किमसाठी काम करा”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.