कितीही स्मार्ट सिटी बनवा, मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा करीत स्मार्ट सिटी बनवण्याच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र या घोषणा अजून कागदावरच आहेत. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईजवळच ‘तिसरी मुंबई’ म्हणजेच नैना सिटी बनवण्याची घोषणा केली आहे. या विधानाचा समाचार युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज घेतला. ‘कितीही स्मार्ट सिटी बनवा, मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही, असा सणसणीत टोला सरकारला लगावला.

मुंबईजवळच तिसरी मुंबई वसवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. मात्र त्याआधी मुंबईतील समस्या पहिल्या सोडवा, असे आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव आहे. मात्र आम्ही आणि मुंबईकर तो यशस्वी होऊ देणार नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सरकारला ठणकावले आहे. मुंबईहून दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये मुख्यालये, कार्यालये हलवणे थांबवा, महाराष्ट्रातील उद्योगधंदे इतर राज्यात नेण्याचे थांबावा, असही आदित्य ठाकरे म्हणाले. नवीन शहर बसवण्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र नवीन शहर वसवण्याआधी प्रदूषण थांबवा असे आवाहनही त्यांनी केले.

z गेल्या दहा वर्षांपासून भाजपने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे कारस्थान केले आहे. भाजपने जीआयएफटीची उभारणी केली. त्यांना विशेष अधिकार, प्रोत्साहन दिले, मात्र मुंबईचे महत्त्व कमी झालेले नाही. तसेच नैना सिटी राज्याकडून उभारली जाणार की, भाजपच्या खऱ्या मालकाकडून असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.