आणखी एक प्रकल्प गुजरातला पळवला? हे पाहून शांत बसू नका, संताप व्यक्त करत आदित्य ठाकरेंचे आवाहन

मिंधे सरकारच्या राजवटीत महाराष्ट्रात येणारे अनेक प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले आहेत. यात ‘टाटा-एअरबस’, वेदांता-फॉक्सकॉन या सारख्या मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. हे सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार हिरावला गेला. आता पुन्हा एक असाच प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये येणारा एक प्रकल्प गुजरातला जाण्याची शक्यता आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून मिंधे सरकारला फटकारत महाराष्ट्रातील तरुणांना एक आवाहन केले आहे.

मंहिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने एका चीनच्या कंपनीसोबत 25 कोटींचा करार केला होता. महिंद्रा कंपनीचं मदर युनिट नाशिकला आहे. त्यामुळे चीन कंपनीसोबत होणारा प्रकल्प हा नाशिकला येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता हा प्रकल्प गुजरातला हलविण्याच्या हालचालींना सुरुवात झाल्याचे समजते. इलेक्ट्रिक कार बनवण्याचा हा प्रकल्प असल्याचे समजते. महिंद्रा कंपनीचा हा प्रकल्प गुजरातला जात असल्याचे समजताच नाशिकमधील उद्योजक नाराज झाले आहेत. महिंद्रा कंपनीवर नाशिकमधील बहुतांश कंपन्या अवलंबून आहेत. त्यामुळे जर हा प्रकल्प गुजरातला गेला तर त्याचा मोठा फटका तेथील उद्योजकांना बसेल. त्यामुळे नाशिकमधील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे समजते.

यावरून आदित्य ठाकरेंनी मिंधे सरकारला फटकारले आहे. ”महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये हलविण्यात येणार आहे. हे पाहून आपण आता शांत बसायचं की महाराष्ट्रद्वेष्टी मिंधे-भाजप सरकारला हद्दपार करायचं, हे आपण ठरवणार! आपल्या राज्यातला युवा ठरवणार!”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.