जनतेसाठी खड्डे; स्वत:साठी खोके! आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारवर निशाणा

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगर येथे भेगा पडल्या आहेत. तर शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावरील स्थानिक वाहतूक आणि दोन गावांना जोडणाऱ्या निर्माणाधीन पुलाला भगदाड पडले आहे. यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत असून यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी समृद्धी महामार्गाला पडलेल्या भेगा आणि भगदाड संदर्भातील वृत्तपत्रातील बातम्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत. “जनतेकरता खड्डे, खड्डे, खड्डे… स्वतःकरता खोके, खोके, खोके… असलं हे खोके धोके सरकार!”, असे कॅप्शन पोस्टला देत आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर टीका केली.

मुंबई-नाशिक, मुंबई-नागपूर, मुंबई-अहमदाबाद… पहिल्याच पावसात तिन्ही महामार्गाची वाताहात झालेली आहे. या रस्त्यांच्या जाहिराती व इव्हेंट मॅनेजमेंटवर भाजपने करदात्यांच्या पैशातून खर्च केलेला. महाराष्ट्राला लुटून भाजपवाले हे असे रस्ते आमच्या माथी मारत आहे. एनएचएआय आणि एमएसआडीसीचा फुगा फुटला असून संपूर्ण महाराष्ट्राने ते पाहिले आहे. पण आम्ही बदल घडवून दाखवू, असेही आदित्य ठाकरे यांनी अन्य एका ट्विटमध्ये म्हटले.

मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाच्या बांधकामात भ्रष्टाचार – पटोले

राज्यातील महायुती सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरू आहे. 55 हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाच्या बांधकामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचारामुळेच या महामार्गाला वर्षभरातच भेगा पडल्या आहेत. एकीकडे मृत्यूचा महामार्ग अशी प्रतिमा निर्माण झालेल्या समृद्धी महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

भ्रष्टाचारामुळेच वर्षभरात समृद्धी महामार्गाला भेगा, महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच ‘समृद्धी’! – नाना पटोले