अर्थसंकल्पात बिहारला भरभरून मिळाले. परंतु, महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही. अशाप्रकारे सातत्याने सर्वाधिक कर भरणाऱया, सर्वाधिक जीएसटी भरणाऱया मुंबई, महाराष्ट्रातील जनतेचा सरकारने अपमान केला आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर एक्सवरून जोरदार हल्ला चढवला आहे.
याआधी बिहारसाठी 2015 मध्ये भाजपने दिलेले 1.25 लाख कोटी आणि 2024 मध्ये दिलेले मोठे पॅकेज बिहारला मिळाले असेलच, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरून सरकारला लगावला आहे. महाराष्ट्राला वेळेवर जीएसटी परतावा मिळत नाही. तसेच विकासनिधीही मिळत नाही. भाजपने 2014 पासून महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले आहे. याआधीच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या 100 हून अधिक आमदारांना निवडून दिल्याबद्दल महाराष्ट्राला शिक्षा मिळतेय का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
बेरोजगारी रोखण्यासाठी उपाययोजना नाहीत
जनतेने ताकद दाखवली असून भाजपला 240 जागांवरच रोखले. यापूर्वी सरकार जनतेला गृहीत धरत होते. आता आयकरात सवलत देत आहे. परंतु, त्यांनी जाहीर केलेल्या श्रेणीपर्यंत पैसे कमवायचे कसे याबाबत काही मार्ग ठेवले आहेत काय? बेरोजगारी रोखण्यासाठी सरकारने उपोययाजने केलेल्या नाहीत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.