हे तर एप्रिल फूल सरकार! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकऱयांना कर्जमाफी आणि ‘अच्छे दिन’ची आमिषे दाखवून सत्तेत आलेल्या भाजप-‘एसंशिं’ सरकारने आर्थिक स्थितीचे कारण देत आता या योजना गुंडाळण्याची तयारी केली आहे. विकासाच्या नावाखाली 100 दिवसांचे टार्गेट ठेवून काम करणाऱया सत्ताधाऱयांच्या कार्यकाळात दंगली, दुर्घटना, अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे हे तर ‘एप्रिल फूल’ सरकार असल्याचा जोरदार हल्ला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला.

आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या फसवणुकीचा पर्दाफाशच केला. निवडणुकीआधी शेतकऱयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते, मात्र आता कर्जमुक्ती देता येणार नाही, अशी घोषणाच उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. अदानीला देवनार डंपिंग ग्राऊंड स्वच्छ करून देण्यासाठी येणाऱया अडीच ते तीन हजार कोटींच्या खर्चाची भरपाई मुंबईकरांच्या खिशातून वसूल करण्याचा डाव असल्याचा ठाम दावाही त्यांनी केला. ‘एसंशिं’ गटाकडे नगरविकास खात्याकडून हे कारस्थान सुरू असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण मुंबईत रस्ते कामाच्या नावाखाली अक्षरशः शहर खोदून ठेवण्यात आले आहे. दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई करणार होते. आता तीन वर्षे होत आली तरी कोणतीही प्रगती नाही, असा टोलाच आदित्य ठाकरे यांनी लगावला. मुंबईकरांना सोयीसुविधा मिळत नसताना आता कचऱयावर कर लावण्यासाठी कार्यवाही सुरू केल्याचेही ते म्हणाले.

कचरा पुन्हा वाढलाच कसा?

शिवसेना पालिकेमध्ये सत्तेत असताना दररोज दहा हजार मेट्रिक टन असणारे कचऱयाचे प्रमाण 2017 नंतर सहा हजार कोटींच्या खाली आणले होते, मात्र आता सरकार आणि पालिकेच्या बेपर्वाईमुळे कचऱयाचे प्रमाण पुन्हा आठ हजार मेट्रिक टनांवर गेल्याचेही आदित्य ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले.

घरे, वीजही महागणार

प्रशासनाच्या निर्णयामुळे रेडी रेकनरचे दर वाढणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे घरांच्या किमती वाढणार असून स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही. शिवाय बेस्ट आणि अदानीच्या विजेचा दर वाढणार असल्याचेही समोर आले आहे.

जनतेची भूमिका जाणून घेणार

पालिका प्रशासनाच्या प्रस्तावित करवाढीला शिवसेनेचा विरोध आहे. शिवाय करवाढीबाबत मुंबईकरांमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून 31 मेपर्यंत जनजागृती केली जाणार असून घरोघरी जाऊन करवाढीविरोधात हरकती-सूचना घेतल्या जाणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईला खड्डय़ात घातले, आता कचऱयावर कर

कडाडून विरोध करणार

शिवसेनेच्या सत्ताकाळात तोटय़ात असणाऱया पालिकेच्या ठेवी तब्बल 92 हजार कोटींवर गेल्या. आम्ही सत्तेत असताना कोणतेही छुपे टॅक्स लावले नाहीत, मात्र आताचे सरकार छुप्या मार्गाने मुंबईकरांवर कर लादत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना करमाफी दिली आहे. मात्र आता 500 चौरस फुटांच्या घरांवरही प्रत्येक महिन्याला 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. दर तीन वर्षांनी हा कर वाढत जाणार आहे, मात्र शिवसेना मुंबईकरांवर अन्याय होऊ देणार नाही. तरीदेखील पालिका प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास जोरदार आंदोलनही करण्यात येईल, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.