या सरकारमध्ये नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणारे कुणी आहे का? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरात घुसलेल्या चोरांनी चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या घटनेबाबत एक ट्विट करत राज्य सरकारला फटकारले आहे. ”सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला हा धक्कादायक आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे ऐकून बरं वाटलं. त्याच्या आयुष्यावरील संकट टळलं असून आशा आहे की लवकरच त्याच आयुष्य पूर्ववत होईल. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे हे ढळढळीत उदाहरण आहे. गेल्या तीन वर्षातील हिट अँड रन प्रकरण, अभिनेते, अभिनेत्री, नेत्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या तसेच बीड-परभणीसारख्या घटनांवरून हे स्पष्ट होतंय की हे सरकार राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात तसेच गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरलेले आहे. या सरकारमध्ये नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणारे कोणी आहे का?, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.