
राज्यात एकीकडे गद्दारांनी उच्छाद मांडलेला असतानाच नाशिक जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांचे निर्धार शिबीर आज पार पडत आहे. नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसाठी असलेल्या निर्धार शिबीरासाठी कार्यकर्त्यांनी झाडून हजेरी लावली. या निर्धार शिबीराचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या खास शैलित आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना सत्ताधारी भाजप, एसंशि गट आणि अजित पवार गट यांच्या कार्यपद्धतीची पोलखोल केली. तसंच धर्म विरुद्ध धर्म, जात विरुद्ध जात, अशी परस्थिती निर्माण करत भाजपने देशात करून ठेवलेली अंतर्गत फाळणी धोक्याची घंटा वेळीच ओळखण्याचा सल्ला आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून शिवसैनिकांना दिला. नाशिक येथे आयोजित शिवसेनेच्या शिबिरामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना, शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी, कायदा-सुव्यवस्था, महायुती सरकारचा 100 दिवसांचा ‘हनिमून पिरीयड’ यासारख्या विविध विषयांवरून सरकारवर हल्लाबोल केला.
आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे –
– महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. आता त्यांनी दिवस मोजायला सुरुवात केलीय. नव्या सरकारच्या पहिल्या 100 दिवसांना हनिमून पिरीयड बोलले जाते. निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आपल्या डोक्यावर बसवलेल्या या महाझूठी सरकारने पहिल्या शंभर दिवसात शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी, महिलांसाठी एक तरी ठळक कोणती योजना आणली?
– लाडक्या बहीण योजनेचे काय झाले? दीड हजार राहणार की 500 देणार या चर्चा सुरू आहेत. भाजप, एसंशी, दादा गटाने गावा गावात जाऊन 2100 देणार सांगितले होते. एवढे ठासून बहुमत आल्यावर आपलाच वचननामा, जाहिरनाम्यातून एकही गोष्ट पहिल्या बजेटमध्ये आणत नाहीत यासाठी एक वेगळीच कातडी, निर्लज्जपणा लागतो.
– लाडक्या बहीण योजनेतून 8 लाख महिला कमी केल्याची बातमी वाचली. अडीच कोटी महिलांना लाभ मिळणार म्हणत होते, पण आता जवळपास 50 लाख महिला कमी करणार आहेत. लिहून घ्या, यांचेच कुणीतरी कोर्टात जाईल, हेच लोक कोर्टात जाऊन लाडकी बहीण योजना बंद करतील. यांना काहीही लाज-लज्जा राहिलेली नाही. हे सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आपल्या डोक्यावर बसवलेले आहे. दुसरे कुणी यांना आशीर्वाद देऊ शकलेले नाही. लाडक्या बहिणींना 2100 मिळाले नाहीच, 1500 तरी मिळतील शाश्वती नाही. लाखो महिला योजनेतून कमी केल्या आहेत. ज्या महिलांच्या खात्यात पैसे गेले ते परत घेत आहेत, काहींवर पोलीस कारवाई करणार असेही ऐकू येत आहे.
– महिलांवरील अत्याचार वाढायला लागले आहेत. पुण्यात एका एसटी बसमध्ये बलात्कार झाला. गृहराज्यमंत्र्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, सगळे शांततेत पार पडले. महिलेने काही आरडाओरडा केला नाही, त्यामुळे कुणाला काही कळले नाही. असे बोलणारे गृहराज्यमंत्री आपल्याला राज्याला मिळालेले आहेत.
– 100 दिवसांमध्ये पुण्यातील बलात्कार झाला, लाडकी बहीण योजना बंद पडली, बीड, परभणीचे प्रकरण झाले. बीडचा आका कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तरीही हे प्रकरण अनेक दिवस टांगत ठेवले. माध्यमांनी फोटो दाखवले तेव्हा मुख्यमंत्र्यांना कारवाई करावी लागली आणि एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. भाजपचे आमदार विधान भवनामध्ये सांगत होते तेव्हा मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी आणि कुणी बांधले होते? अशी काय मैत्री होती की बीड प्रकरणात ते स्वत:च्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकले नाहीत? भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या होते आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नसेल तर सामान्यांनी करायचे काय?
– परभणीमध्ये पोलीस कोठडीमध्ये मारहाणीत मृत्यू झाला. मोर्चे काढले, सगळे काही झाले. पण अजूनही त्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. महाराष्ट्रात सामान्य माणसाची हत्या होते, बलात्कार होतो, खून होतो, लुटला जातोय. पण मुख्यमंत्र्यांकडून, गृहमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा करणे सर्वात मोठा गुन्हा झाला आहे. तशी अपेक्षा केली तर 353 कलम टाकले जाईल.
– कोकणात वैभव नाईक यांनी एक प्रकरण समोर आणले आहे. भाजप, एसंशी गटातून नक्की तो गुन्हेगार आहे, तो ड्रग्ज तिथे पुरवायचा, त्याला पाठिंबा कुणाचा आहे? ते ड्रग्जचे पैसे कुणाच्या घरात जायचे याची चौकशी होणार का? स्थानिक लोकप्रतिनिधींचा सीडीआर कधी काढला जाणार? एसपींना कुणी फोन केला, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला हे काढले जाणार का?
– दुसरी सगळ्यात मोठी फसवणूक शेतकरी बांधवांची झाली आहे. देवेंद्र फडणवीस बेंबीच्या देठापासून ओरडत होते की, आमचे सरकार येणार आणि सरकार आल्यानंतर कर्जमाफी मिळणार, सातबारा कोरा होणार, वीज बील माफ करणार.हे सगळे सांगितल्यानंतर फडणवीस यांचे सरकार बसले. त्यांचे स्वत:चे 135 आमदार आले. एसंशी तिकडे चिकटलेले आहेत. कारण बाहेर पडले तर जेलमध्ये जातील. पण मुद्दा हाच आहे की ते महिलांना, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. पण दादांनी सांगितले की पुढचे पाच वर्ष कर्ज नियमित भरावे लागेल. कुणालाही कर्जमुक्ती मिळणार नाही.
– निवडणुका तोंडावर नसताना देखील मुख्यमंत्री बनल्या बनल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. कर्जमुक्तीच नाही तर कोविडच्या काळात अर्थचक्र बंद पडलेले असतानाही शेतकऱ्यांवर संकट आले तेव्हा तिजोरीत किती पैसे आहे हे न पाहता शेतकऱ्यांना मदत केली. हे पहिल्या 100 दिवसातील काम आहे आपले. महिलांवर अत्याचार वाढत असताना देशातील सर्वात कडक कायदा जो भाजपने रद्द केला ते शक्ती बील पास करणारे एकमेव मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत.
– अवकाळी पावसामुळे बुलढाणा, जालना, नाशिकमध्ये नुकसान झाले. एक रुपयाची तरी मदत आली का? कृषीमंत्री म्हणतात, कर्जमुक्तीचे पैसे घेऊन शेतकरी साखरपुडे, घरातले कार्यक्रम करतात. सरकारी पैशांचा दुरुपयोग केला म्हणून त्यांना बाद करायला पाहिजे होते. पण ते निर्लज्जपणे शेतकऱ्यांना दमदाटी करत फिरत आहेत.
– मध्यंतरी मुख्यंमत्री दावोसा जाऊ आले आणि 20 कोटींची गुंतवणूक आल्याचे सांगितले. एवढी गुंतवणूक राज्यात आली असती तर तिजोरीचा जो बट्ट्याबोळ झालेला आहे, तिजोरीमध्ये घंटा वाजतेय अशी परिस्थिती झाली नसती.
– स्मार्ट सिटी योजनेचे काय झाले? रस्ते नीट झाले का, पाणी वेळेवर येते का, वीजेचे काय, रस्ते खड्डेमुक्त झाले का? सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना सुरू आहे. आवडत्या कॉन्ट्रॅक्टरची बील भरली जात असून इतरांची थकबाकी आहे. मुंबईत प्रत्येक रस्ता खोदून ठेवला आहे. पुण्यात रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली वेताळ टेकडी खोदली जात आहे. गावं, शहरं उद्ध्वस्त होत आहे. तरुणांना कळत नाही एमआयडीसीत जावे, शहरात जावे की गावी रहावे. गावी राहिलो तर शेतमालाला भाव नाही, शहरात आलो तर एमआयडीसीत नोकरी मिळत नाही, शासकीय नोकरी मिळवायला गेलो तर कधी पेपर फुटतो, तर कधी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत मिळत नाही. मग महाराष्ट्राने नेमके जायचे कुठे?
– महाराष्ट्रात पालकमंत्रीपद कुणाला मिळणार यावरून भांडण सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या संस्थेकडून रस्ते होत नाही, त्यांना कुंभमेळ्याचे नियोजन करायचे आहे. हे पैसे कुणाच्या खिशात जाणार? रस्त्यावरील खड्डे, शाळेची फी वाटते आहे, घराबाहेर कचऱ्याचे ढिग साचत आहेत, वेळेवर पाणी नाही यातून लक्ष विचलित करून आपल्याला धर्म, जात, जिल्हा नाही तर तालुका नाही तर सोसायटीत व्यस्त ठेवलेले आहे. तोडा, फोडा, राज्य करा’ ही ब्रिटिशांची जी नीती होती, तीच आता भाजपने घेतली आहे.
– विकास, अच्छे दिन, 15 लाख खात्यात टाकणार, काळा पैसा परत आणणार या मुद्द्यावर 2014 ची निवडणूक लढले. पण स्किल इंडिया आले की बंद पडले? फिट इंडिया आले की बंद पडले? मेक इन इंडिया खरोखर होतंय का? इनक्रेडिबल इंडिया होतेय का? अच्छे दिन आले का? महागाई आटोक्यात आली का? काळा पैसा आला का? हिंदुस्थान भ्रष्टाचारमुक्त झाला का? उलट भाजपने 10 पट भ्रष्टाचारी गोळा केले. ज्या कुणावर डाग होते ते भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये गेले आहेत. खुनी, बलात्कारी, भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेला की पटापट वाशिंग मशीनमध्ये घुतला जातो, त्यांना सीट दिली जाते, मंत्री बनवले जाते.
– 2019 मध्ये भाजप राष्ट्रीयत्व, देशभक्तीवर निवडणूक लढले होते. पुलवामा, बालाकोट झाले होते. सैन्याचे फोटो मागे लावून भाजप नेत्यांनी प्रचार केला. पण 2014 ते 2019 मधील मूळ विषय 2019 ला बाजुला ठेवला, 2019 ला ज्यावर लढले तो विषय 2024 ला बाजाला ठेवला. आता ते पंतप्रधान चीनवर बोलायला तयार नाहीत, ज्या नवाज शरीफने देशावर कारगिलचे युद्ध लादले, देशाच्या जवानांना शहीद केले त्याच्या वाढदिवसाचा केक खायला मोदी पाकिस्तानात गेले. आपल्यासमोर जो देशाचा शत्रू होता तो पाकिस्तान न राहता देशामध्ये शत्रू निर्माण केले. उत्तर विरुद्ध दक्षिण, जात विरुद्ध जात, धर्म विरुद्ध धर्म, समाज विरुद्ध समाज. आज देशाला खरा धोका भाजपने करून ठेवलेल्या अंतर्गत फाळणीचा आहे. ही धोक्याची घंटा आहे.