कश्मीर बद्दलची सरकारची समज कमी पडतेय का अशी शंका येते, आदित्य ठाकरे यांची टीका

जम्मू कश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तब्बल सात जवान शहीद झाले आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर जाताच कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी कठुआ जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चार 4 जवान शहीद झाले त्या आधी शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते.

यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देशातील सरकारला फटकारले आहे. सरकारकडून सतत कश्मीर सुरक्षित असल्याच्या वल्गना केल्या जातात. मात्र दुसरीकडे कश्मीरमध्ये सतत हल्ले होत आहेत. अश्या स्थितीत काश्मिर बद्दलची सरकारची समज कमी पडतेय का अशी शंका येते, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. ”कश्मीरमध्ये सैन्यदलावर झालेला भ्याड अतिरेकी हल्ला भयंकर आहे, नींदनीय आहे. ह्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच जखमींना लवकर आराम पडो ही प्रार्थना! कश्मीर सुरक्षित झाल्याच्या वल्गना करणाऱ्या आणि त्या ‘खोट्या नरेटिव्ह’ वर मतं मागू पाहणाऱ्या राजवटीने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आपल्या जवानांवर हल्ले वाढले आहेत, सातत्याने तश्या बातम्या येत आहेत, अनेक जवान शहिद होत आहेत. अशा स्थितीत कश्मीर बद्दलची सरकारची समज कमी पडतेय का अशी शंका येते. कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होणे आणि भारताचा अविभाज्य भाग असलेल्या ह्या प्रदेशातला हिंदुस्थान नागरिक सुखाने नांदणे आवश्यक आहे”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.