फोडा आणि राज्य करा ही भाजपाची नीती आहे. सगळय़ांना लुटा, महाराष्ट्राला खाली खेचा, धर्मा-धर्मात, जाती-जातीत तेढ निर्माण करणे, हाच भाजपाचा सर्वधर्मसमभाव आहे, असा हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
येवला आणि मनमाड येथे गुरुवारी महाराष्ट्र स्वाभिमान सभेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. महाराष्ट्राचा विकास खुंटला आहे. खोके सरकारमुळे महामार्गच नव्हे, तर गावोगावी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पायाभूत सुविधा दिल्या जात नाहीत. भरपावसाळय़ात टँकरने पाणी द्यावे लागतेय. दोन वर्षांत महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग आला नाही, ते गुजरातलाच गेलेत. आयबीपीएस आणि एमपीएससीच्या परीक्षा एकाचवेळी घेण्याचा आडमुठेपणा सुरू आहे. पुण्यात हजारो विद्यार्थी आंदोलन करतायेत. सरकार मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शेतकरी त्रस्त आहेत, बेरोजगारी वाढली आहे, महिला असुरक्षित आहेत, कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राला अडवायचा, थांबवायचा प्रयत्न असतो. अगदी ऑलिम्पिकच्या ट्रेनिंगसाठी पैसे देताना दुजाभाव केला जातो. महाराष्ट्राला, गुजरातला किती पैसे मिळाले व किती खेळाडू गेले याचाही विचार व्हायला हवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
भ्रष्ट, अनागोंदी कारभाराची परिस्थिती बदलण्यासाठी सत्ताबदल आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्र रहा. जिथे अपयश येते तिथे भाजपा फुटीचं राजकारण करतो. हिंदू-मुस्लिमांमध्ये, धर्मा-धर्मात, तसेच जाती-जातीत ओबीसी, मराठा, धनगर अशी तेढ निर्माण करायची ही भाजपाची भूमिका आहे. मराठा आरक्षणाबाबत या सरकारने तीनवेळा फसवले, असेही त्यांनी सांगितले. पह्डा आणि राज्य करा ही भाजपाची नीती आहे, गैरसमज निर्माण करायचे, दंगली घडवायच्या, असे उद्योग सुरू होतील, त्यासाठी व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचा वापर केला जाईल, त्याला बळी पडू नका. महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकजुटीने राहा, असे आवाहन त्यांनी केले. सर्वांना लुटा, महाराष्ट्राला खाली खेचा, हाच भाजपाचा सर्वधर्मसमभाव आहे. त्यांचा हा कुटील डाव हाणून पाडा, परिवर्तनासाठी वज्रमूठ कायम ठेवा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
यावेळी संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, प्रवीण नाईक, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, कुणाल दराडे, गणेश धात्रक, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, विलास शिंदे, वसंत गीते, डी. जी. सूर्यवंशी, राहुल ताजनपुरे, राष्ट्रवादीचे सुभाष निकम, विठ्ठलराव शेलार, काँग्रेसचे मंगलसिंग परदेशी, सुयोग गायकवाड आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
येवला आणि मनमाड या दोन्ही ठिकाणी हजारो शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचे ढोल-ताशांच्या गजरात, जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘उद्धवसाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ठिकठिकाणी त्यांचे नागरिकांनी मोठय़ा उत्साहात स्वागत केले.
महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या तर पराभव होईल, ही भीती खोके सरकारला आहेच. निवडणुकीनंतर सत्ता गेली तर माझा लाडका कॉण्ट्रक्टर योजना बंद होण्याचीही धास्ती त्यांना आहे. सगळे कॉण्ट्रक्टर त्यांचेच आहेत. यामुळेच दहा वर्षांत सुधारणा झाली नाही. रस्त्यांवरील खड्डे वाढत चालले आहेत. यामुळे टोलचे दुकान बंद करून हाडवैद्याचा दवाखाना काढा, असा टोला त्यांनी हाणला.
जिथे अपयश येते तिथे भाजपा फुटीचं राजकारण करतो. हिंदू-मुस्लिमांमध्ये, धर्मा-धर्मात, तसेच जाती-जातीत ओबीसी, मराठा, धनगर अशी तेढ निर्माण करायची ही भाजपाची भूमिका आहे. मराठा आरक्षणाबाबत या सरकारने तीनवेळा फसवले