केंद्राकडून निधी मिळवण्याची आणि राज्याचं भलं करण्याची धमकच यांच्यात नाही! आदित्य ठाकरे यांची मिंधे सरकारवर टीका

राज्यात भाजपचे सरकार असतानाही केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. संपूर्ण अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा उल्लेखच नसल्याने सध्या महाराष्ट्रातील मिंधे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यातील मिंधे सरकारला फटकारले आहे. फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांमध्ये केंद्राकडून निधी मिळवण्याची आणि राज्याचं भलं करण्याची धमकच नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

”आजच्या भाजप प्रणित केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केला गेल्याचं दिसलं नाही! महाराष्ट्राला ही वागणूक का? महाराष्ट्राने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर राखत तुमच्या संविधान विरोधी सत्तेला आळा घातला म्हणून? की महाराष्ट्राची जनता अजूनही स्वाभिमानी आहे म्हणून? की महाराष्ट्रावर यांचा जूना आकस आहे म्हणून? बिहार आणि आंध्र प्रदेशला त्यांचा वाटा नक्की द्या, पण महाराष्ट्र सर्वात मोठा करदाता असूनही भाजपाचा महाराष्ट्रावर एवढा राग कश्यासाठी? महाराष्ट्रातल्या ट्रिपल इंजिन सरकारला आपल्या राज्यासाठी या बजेटमधून काय मिळवता आलंय? ना विशेष पॅकेज, ना निधी, ना हक्काचा वाटा! मिंधे राजवटीला फक्त दिल्लीसमोर लाचारी पत्करायला, महाराष्ट्रातले उद्योग परराज्यात पाठवायला, प्रचंड भ्रष्टाचार करुन राज्याची तिजोरी रिकामी करायला आणि फोडाफोडीचं राजकारण करायला जमतं! महाराष्ट्रासाठी केंद्राकडून निधी मिळवण्याची आणि राज्याचं भलं करण्याची धमकच यांच्यात नाही”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी राज्य़ातील मिंधे सरकारला फटकारले आहे.

ज्यांना वाटतंय की बिहार व आंध्र प्रदेशला या बजेटमध्ये जे काही दिलं आहे ते त्यांना मिळेल तर त्या लोकांनी एकदा मागे वळून बघावं. अशा प्रकारचे अनेक वादे याआधीही केंद्र सरकारने केलेले आहेत. आठ वर्षांपूर्वी बिहारसाठी 1,25,000 कोटींच्या पॅकेजची घोषणा झाली होती. 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्यात येणार होती, शहरं स्मार्ट होणार होती. बिहार आंध्रला जे जाहीर झालंय ते मिळालं तर मला आनंदच होईल. पण हे काही बिहार व आंध्र प्रदेशमधील जनतेला मिळालेले नाही. तर हा पैसा सरकारच्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे, अशी टीका आदित्य ठाकरे य़ांनी केली आहे.