मुंबईत प्रदूषण करणाऱ्या बिल्डर आणि कंत्राटदारांवर पालिकेने कोणती कारवाई केली? आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः दक्षिण मुंबईसह शहर आणि पश्चिम उपनगरला गेल्या दोन दिवसांपासून अक्षरशः विषारी धुरक्याचा वेढा पडल्याचे दिसून आले. अनेक भागात काही मीटर अंतरावरील इमारतीही धूसर दिसत होत्या. विषारी धुरक्यामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाली असून पालिका रुग्णालयांत अशा रुग्णांची संख्या 25 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

मुंबईतील प्रदूषणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका व राज्य सरकारला काही सवाल केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी याबाबत X वर एक ट्विट केले आहे. ”मागील दोन दिवसांपासून मुंबई व उपनगरांतील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येतेय. ठिकठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे धुळीचे प्रमाण वाढतेय. वाहनांमुळे होणारे प्रदूषण त्यात भर टाकत आहे. महापालिका प्रशासन प्रदूषणाच्या मुद्याबाबत गांभीर्याने विचार करणार आहे की नाही? गेल्यावर्षी मुंबई महानगरपालिकेने प्रदूषणविषयक मार्गदर्शक सूचना बिल्डर आणि कंत्राटदारांसाठी जारी केल्या होत्या. या सूचनांचे पालन होतेय का? नियमभंग करणाऱ्यांवर पालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे का? प्रदूषण करणाऱ्या बिल्डर आणि कंत्राटदारांवर पालिकेने आतापर्यंत कधी व कोणती कारवाई केली आहे का? पालिका प्रशासन आणि सरकारने याविषयी ठोस पावले उचलून कार्यवाही करणे अपेक्षित आहे; कारण मुंबईकरांचे स्वास्थ्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.