हे सरकार वादे पूर्ण नाही करत पण वाद घालण्यात व्यस्त आहे – आदित्य ठाकरे

पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ”सध्याचं सरकार बघितलं तर कुणी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज आहे, कुणी बंगला मिळालं नाही म्हणून नाराज आहे, कुणी पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज आहे. सरकार वादे पूर्ण नाही करत पण वाद घालण्यात व्यस्त आहे. लाडकी बहिण योजना सुरू झालेली नाही, दिलेली आश्वासनं शंभर दिवसात पूर्ण करणार होते पण ते ही झालेले नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी सोमवारी संध्याकाळी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी बांगलादेशींची घुसखोरी व पालकमंत्रीपदाच्या वादावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ”आधी सरकार स्थापन व्हायला वेळ, नंतर खातेवाटपाला वेळ, बंगल्यावरून वाद, पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री परदेशी असताना पालकमंत्रीपदाच्या यादीला स्थगिती दिली. नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे. हा ज्याला हे पद मिळालं होतं त्याचा देखील हा अपमान आहे. कुठेतरी, कोणतरी नाराज व्हायचं, रस्त्यावर टायर जाळायचे, रास्तारोको करायचा. आधी मंत्रीपदासाठी नंतर पालकमंत्रीपदासाठी हावरटपणा करायचा. ही स्वार्थी लोकं भांडायला लागले आहेत. ही भांडण कुठलं खातं कुठलं मंत्रीपद कोणाला मिळणार यावरून झालेली आहे आता पालकमंत्रीपदावरून सुरू आहेत. रास्तारोको करून जाळपोळ करून पालकमंत्रीपदं मिळत असतील तर ते चुकीचे आहे. हा हावरटपणा स्वार्थीपणा बरा नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”जे मुख्यमंत्री कोणासमोर झुकत नाही. जनतेसमोर झुकत नाही, लाठीचार्ज करतील पण झुकणार नाही असे मुख्यमंत्री ईव्हीएमने बहुमताचं संख्याबळ दिलेले असतानाही ते झुकतात कसे? असे रुसवे फुगवे कितपत चालू देणार? हे असंच चालू राहिलं तर जनतेची कितपत सेवा होणार. मुख्यमंत्री एवढे हतबल कसे हा प्रश्न आम्हाला पडलाय. का एवढी दादागिरी सहन करतायत? एका मंत्र्याचे चेले रस्ता रोको करतायत म्हणून लगेच यादीला स्थगिती दिली. तिथे बीड आणि परभणी मधली जनता न्यायासाठी किती आक्रोश करतेय, तिथे नाही गेले लगेच स्थगिती द्यायला, न्याय द्यायला. जी लोकं त्यांच्या हावरटपणामुळे लोकांना त्रास देतात त्यांना काढून टाकायला हवे की त्यांचे ऐकून स्थगिती द्यायला हवी. पालकमंत्रीपदावरून भांडणं होत असतील तर जनतेची सेवा कधी करणार, पालकमंत्री नाही तर जिल्ह्याचे मालकमंत्री व्हायचेय, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

” सध्याचं सरकार बघितलं तर कुणी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज आहे, कुणी बंगला मिळालं नाही म्हणून नाराज आहे, कुणी पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज आहे. सरकार वादे पूर्ण नाही करत पण वाद घालण्यात व्यस्त आहे. लाडकी बहिण योजना सुरू झालेली नाही, दिलेली आश्वासनं शंभर दिवसात पूर्ण करणार होते पण ते ही झालेले नाहीत, अशी टीका देखील त्यांनी केली.