कितीही चिखल झाला तरी कमळ फुलू देणार नाही, आदित्य ठाकरे यांचा निर्धार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी त्यांच्या वरळी मतदारसंघातून पत्रकारांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जांबोरी मैदान येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पावसामुळे जांबोरी मैदानात चिखल झाला होता त्याविषयी पत्रकारांनी विचारले असता आदित्य ठाकरे यांनी कितीही चिखल झाला तरी कमळ फुलू देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

वरळी मतदारसंघावरून सध्या सुरू असलेल्या राजकारणावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, की गेल्या वेळेला जेव्हा मी निवडणूक लढवत होतो तेव्हा अनेकांना मी सांगितलेले की काही वर्षांनी वरळी बघायला या. आता मी त्यांच्या काही मोठ्या लोकांना आव्हान करतो की त्यांनी यावे आणि वरळीत रोड शो करावा. त्यांनी केलेला रोड शो आम्हाला फळतो”.

यावेळी पत्रकारांनी अटल सेतूला पडलेल्या भगदाडाविषयी विचारले असता आदित्य ठाकरे यांनी आता ते या पुलावर व्हिडीओ शूट करणारे कलाकार कुठे गेले असा सवाल केला आहे. ”अटल सेतूच्या रँम्प रोडला तडे गेले आहेत. याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने ज्या प्रकारे उत्तर दिलं ते अतिशय निर्ल्लज्जपणाचं होतं. त्या प्रोजेक्ट हेडला तत्काळ निलंबीत केलं पाहिजे. इतर कोणत्या देशात असे उत्तर दिले असते तर आतापर्यंत तो निलंबीत झाला असता. पावसाळ्यात खचला गेला हे काय उत्तर आहे का? आणि ज्या अभिनेत्यांनी या पुलावर व्हिडीओ बनवला ते आता कुठे आहेत? असा सवाव आदित्य ठाकरे यांनी केला.