
मुंबईतील रस्त्यांचा घोटाळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वीच समोर आणला होता. गेल्या दोन वर्षात मुंबईतील अनेक रस्ते खोदून ठेवलेले आहेत. त्यावरून आता इतर पक्षांचे आमदारही तक्रार करू लागले आहेत. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या रस्त्यांची पाहणी करत आहेत. याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर करत मिंधे व भाजपला फटकारले आहे.
”मुंबईतील सर्व आमदारांनी रस्त्यांच्या कामांबाबात तक्रार केल्यानंतर आता घोटाळेबाज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील रस्त्यांवर फेऱ्या मारत आहेत. 2 वर्षापूर्वी आम्ही त्यांचा घोटाळा आणि खोटेपणा उघड केला आहे. त्यांच्या आवडत्या कंत्राटदारांनी पैसे कमवले पण आमचे शहर खराब करून ठेवले, ज्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे ते अत्यंत वाईट दर्जाचे आहे. गेल्या 3 वर्षांपासून महापालिकेच्या निवडणूका न झाल्याने पालिका भाजप आणि मिंधे चालवत आहेत. भाजप आता माझी भाषा बोलत आहे परंतु अडीच वर्षे मिंधेच्या भ्रष्ट राजवटीला ते पाठिंबा देत आहे आणि तो अजूनही मिंधे त्यांच्याच छत्रछायेखाली आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या इंस्टा स्टोरीवर लिहले आहे.