भाजपचे विकासाचे मॉडेल फक्त काँन्ट्रॅक्टर मित्रांसाठी, आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबईत पावसाने रस्त्यांची अक्षरशः चाळण केली असून या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम मुंबई पोलीस करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर जोरदार टीका केली होती. दरम्यान सोमवारी देखील आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट करत यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

”भाजपच्या विकासाच्या मॉडेलचा भंडाफोड झाला आहे. बराच काळ आम्हाला असं वाटत होतं की भाजपचे विकासाचे मॉडेल हे जनतेसाठी आहे. पण आता या विकास मॉडेलचा भंडाफोड झाला असून आता आम्हाला कळतंय की हे मॉडेल फक्त भाजपच्या काँन्ट्रक्टर मिंत्रांसाठी आहे. सामान्य जनतेच्या विकासासाठी नाही” , असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ उपनगरातील असून रस्त्यावर पडलेल्या एका तलावाएवढा मोठा खड्डा बुजवण्याचे काम तीन पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना खाकी वर्दीत करत आहेत. भरपावसात हे काम सुरू आहे. एक पोलीस शिपाई हातात छत्री घेऊन दोन सहकाऱयांना मार्गदर्शन करतोय, तर दोघे कर्मचारी थेट रस्त्यावर ओतून ठेवलेली खडी फावडय़ाने खेचून खड्डा भरण्याचे काम करत आहेत. आजूबाजूला रस्त्यावर वाहनांची ये-जा, हॉर्नचा आवाज, गोंधळ-गडबड सुरू आहे आणि ही ये-जा सुरू असताना पायातले बूट काढून पँट वर करून हे दोन शूर शिपाई अपघात होऊ नये यासाठी वेगळ्या प्रकारेच कर्तव्य निभावत आहेत.