भाजपला महाराष्ट्राचा एवढा द्वेष का? अर्थसंकल्पावरून आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

केंद्रातील एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला. या अर्थसंकल्पात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व महाराष्ट्राला काहीही देण्यात आलेले नाही. त्याउपर अर्थमंत्र्‍यांच्या भाषणात महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नव्हता. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील भाजपला फटकारले आहे. ‘भाजप महाराष्ट्राचा एवढा द्वेष आणि अपमान का करते?’ असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केला आहे.

‘ भाजपला आपले केंद्रातील सरकार वाचवायचे आहे त्यामुळे त्यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठ्या प्रमाणात निधी दिला हे कळतंय आम्हाला. पण य़ात महाराष्ट्राचा काय दोष आहे? महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे करदाते राज्य आहे हा दोष आहे का? देशाच्या अर्थव्यवस्थेत आम्ही जे योगदान दिले त्याबदल्यात आम्हाला काय मिळाले? अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा एकदा तरी उल्लेख झाला का? भाजप महाराष्ट्राचा एवढा द्वेष आणि अपमान का करते? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केले आहेत.

”ही काही पहिलीच वेळ नाही, गेल्या दशकभरात भाजपच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राविरुद्ध हा पक्षपातीपणा सुरुच आहे. असंवैधानिकपणे सरकार स्थापन करून आणि आपल्या राज्यात सर्वात भ्रष्ट राजवट चालवूनही महाराष्ट्राला त्याबदल्यात काहीच मिळत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मिंधे राजवटीतील भ्रष्टाचार आणि नंतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून महाराष्ट्राची सुरू असलेली लूट. यालाच आपल्याला तोंड द्यावे लागत आहे’, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.