बांगलादेशचा क्रिकेट संघ सध्या हिंदुस्थान दौऱ्यावर आला आहे. टीम इंडिया व बांग्लादेशमध्ये सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये कसोटी व टी-20 सामने होणार आहेत. एकीकडे भाजप नेते बांगलादेशमधल्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत बोलतात व दुसरीकडे भाजपकडून बांग्लादेश संघाला पायघड्या घातल्या जात आहेत. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी परराष्ट्र मंत्रालयाला एक सवाल करत भाजपला फटकारले आहे.
”19 तारखेपासून हिंदुस्थान विरुद्ध बांग्लादेश कसोटी मालिका सुरू होणार आहे. याबाबत कुठलीही भूमिका घेण्याआधी मला परराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घ्यायचं आहे की खरंच बांगलादेशमध्ये गेल्या दोन महिन्यात हिंदूवर अत्याचार झाले आहेत की नाही? बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होतायत, मंदिरं तोडली जात आहेत, लहान मुलांवर अत्याचार होत आहेत या बातम्या व्हॉट्सअॅप सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात होत्या. ALL EYE ON HINDU IN BANGLADESH असं इंस्टाग्रामवर चालवलं जात होतं. काही काही ठिकाणी दंगली देखील घडवण्याचा प्रयत्न झाला. भाजपचे काही चहिते त्यांचे तथाकथित हिंदूत्वावदी असतील. त्यांनी यावरून आपल्या देशातील हिंदू मुस्लिमांमध्या वाद निर्माण करायचा प्रयत्न केला. पाच वर्षापूर्वी CAA/NRC च्या वेळी देखील बांग्लादेशमधल्या हिंदूवर अत्याचार होतो असं सांगितलं जात होतं. हे सगळं होत असताना केंद्रात भाजपचं सरकार आहे, बीसीसीआयमध्ये देखील भाजप आहे, असं असताना हिंदूवर अत्याचार करणाऱ्या बांग्लादेशसोबत आपण सामने खेळणार आहोत. खरंतर जेव्हा जेव्हा निवडणूका येतात तेव्हाच भाजपला हिंदू आठवतात. हिंदूचा वापर भाजप फक्त निवडणूकीसाठी होतो असं समजायचं का? त्यामुळे मला परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती हवी आहे खरंच गेल्या दोन महिन्यात हिंदूवर अत्याचार झाले की नाही झाले. केंद्र सरकारने याबाबत स्पष्टता दयावी. जर खरंच तिथल्या हिंदूवर अत्याचार झाले आहेत तर आपण त्यांच्यासोबत का खेळत आहोत याचं उत्तर भाजपने द्यावं, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ज्यावेळी हिंदुस्थानवर अतिरेकी हल्ले होत होते त्यावेळी पाकिस्तानसोबत क्रिकेट नको अशी आमची ठाम भूमिका होती. युपीएचे सरकार असताना देखील सामने खेळले गेले नव्हते. त्यामुळे आता आम्हाला भाजपकडून समजतंय की हिंदूंवर अत्याचार होतोय मग आपण बांग्लादेशसोबत क्रिकेट का खेळतोय? भाजप नेत्यांना हे मान्य आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.