भाजपा कोणाचीही नाही, जैन मंदिरावरून आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबईतील विलेपार्ले येथील 35 वर्ष जुने मंदिर महापालिकेने एकाएकी पाडले. त्या विरोधात आज जैन समाजाने मोठ्या प्रमाणात एकत्र येत निदर्शने केली. या आंदोलनाला भाजपचे नेते व मुंबई चे पालक मंत्री मंगल प्रभात लोढा देखील हजर होते. त्यावरून शिवसेना नेते आमदार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारला फटकारले आहे.

“दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एक जैन देरासर पाडल्याच्या विरोधात जैन बांधवांनी महापालिका विरुद्ध आंदोलन केलं आहे. सध्या बीएमसी ही पूर्णपणे मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास मंत्री यांच्या नियंत्रणात आहे. मुख्यमंत्री – भाजप चे , उपमुख्यमंत्री – एसंशि गटाचे, दोन सहपालकमंत्री – भाजपचे, राज्य सरकार/मुख्यमंत्री कार्यालय महापालिका चालवते. मग पालकमंत्री कोणाच्या विरोधात आंदोलन करत आहेत? त्यांच्याकडे देरासर वाचवण्याची पूर्ण ताकद अधिकार, पण देरासर वाचवण्याऐवजी ते केवळ नौटंकी करत आहेत! लोढाजी यांचे एक बेकायदेशीर कार्यालय बीएमसीमध्येच आहे आणि त्यांना रिअल इस्टेट आणि अशा प्रकरणांचा मोठा अनुभवही आहे. सर्वांनी हे लक्षात घ्यावं – भाजप कोणाचंही नाही. भाजप सरकारच मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे बीएमसी चालवंतय आणि नामानिराळं राहू पाहतंय”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.