Aaditya Thackeray हे सरकार जनतेचे नाही तर हपापलेल्या राजकारण्यांचे, आदित्य ठाकरे यांनी फटकारले

Aaditya Thackeray on school Mid Day meal – शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून दिल्या जाणाऱ्या अंडी व गोड पदार्थांसाठी लागणाऱ्या साखरेसाठी दिला जाणारा 50 कोटींचा निधी राज्यातील महायुती सरकारने बंद केला आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांच्या साखर कारखान्यांना तब्बल 79 कोटींचा निधी सरकारकडून देण्यात येणार आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी महायुती सरकारला फटकारले आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर दोन बातम्यांची कात्रणं सोशल मीडियावर शेअर करत राज्य सरकारवर टीका केली. ”या दोन बातम्यांवरून राज्यातील भाजप सरकार कशाला प्राधान्य देते ते दिसून येत आहे. 1) राज्य सरकारने नेत्यांच्या साखर कारखाण्याना 79 कोटींचा निधी दिला. 2) राज्य सरकारने शाळांमध्ये मध्यान्ह भोजनात दिली जाणारी अंडी व तांदळाची खीर/नाचणी सत्व यासाठी लागणाऱ्या साखरेचा 50 कोटींचा निधी रद्द केला आहे. मध्यान्ह भोजन हे अनेक विद्यार्थ्यांसाठी पोषक तत्वे मिळणारं एकमेव साधन आहे. पुन्हा एकदा या सरकारने स्पष्ट पणे हे सिद्ध केलं ही हे सरकार फक्त हपापलेल्या राजकारण्याचे आहे. हे सरकार ईव्हीएममुळे निवडून आलेले आहे. हे सरकार सामान्य जनतेचे नाही आणि विशेषत: ज्यांना मतदान करता येत नाही अशा शाळकरी मुलांचे तर अजिबात नाही. मिंधे सरकारमध्ये हिच परिस्थिती गणवेश घोटाळ्याची होती’, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.