शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे भाजप सरकारच्या औद्योगिक धोरणांवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी X या समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करत महाराष्ट्रविरोधी भाजप-मिंधे राजवटीच्या औद्योगिक धोरणाबाबतचे तीन महत्त्वाच्या बाबी शेअर करत सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.
”घटनाबाह्य सरकार सत्तेत आल्यापासून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’चे आयोजन का झालेले नाही, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमधून केला आहे. ” ‘व्हायब्रंट गुजरात’मुळे कदाचित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र रद्द करावा लागला असेल. तामिळनाडूनेही अशाच कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या राज्यात चांगली गुंतवणूक आणली असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच MPCB ने मर्सिडीज बेंझवर टाकलेल्या धाडीवरूनही आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला काही प्रश्न केले आहेत. ”आपल्या राज्यात येणारे मोठे उद्योग त्यांच्या आवडत्या राज्यांना दिले जात असतानाच, नुकतीच MPCB ने मर्सिडीज बेंझवर टाकलेल्या धाडीमुळे उद्योगजगतात मोठी खळबळ उडाली होती. MPCB ने अद्याप त्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती नियमानुसार झाली आहे की नाही, याचे उत्तर दिलेले नाही आणि मर्सिडीज बेंझ कंपनीला दिलेली ती भेट होती की धाड? हे त्यांनी सांगितलेले नाही. मी मर्सिडीज बेंझने कोणत्या नियमांचे उल्लंघन केले याबाबत विचारणा करणारे पत्र MPCB ला लिहिले आहे. त्या पत्राला अद्याप उत्तर मिळालेले नाही. त्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. केवळ एमपीसीबीच्या अध्यक्षांचा अहंकार सुखावण्यासाठी उद्योगांवर कारवाई करायची? आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कंपन्या/उद्योगांना भ्रष्ट राजवटीची अशी गुंडगिरी चालेल का? जे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवू शकत नाहीत, त्यांचे काय? असे काही सवाल या पोस्टमधून आदित्य ठाकरे यांनी केले आहेत
”मुंबईतील बीकेसी येथे झालेल्या (जिथून IFSC गुजरातमध्ये स्थलांतरित करण्यात आले) ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये भाजपचे मंत्री पियुष गोयल जी यांनी ‘GIFT’ची जाहिरात केली. गोयल यांना मुंबईकरांनी मतदान केलं आहे. मात्र त्यांनी महाराष्ट्राला आवश्यक तेवढे प्रोत्साहन दिले नाही. ‘GIFT’ची जाहिरात करा, पण मुंबईलाही तिच्या हक्काचा IFSC द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
सोबतच आदित्य ठाकरे यांनी बेरोजगारी व राज्याच्या आर्थिक स्थैर्यावरून मिंधे भाजप सरकारला फटकारले आहे. ”वाढती बेरोजगारी आणि आर्थिक अस्थैर्याच्या दिशेने मिंधे- भाजप राजवट महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील तरुणांना घेऊन चालली आहे. ते आपला आत्मविश्वास पायदळी तुडवत आहेत. ते महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि आत्मा चिरडत आहेत”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.