महाराष्ट्राची एकजूट महायुतीला पराभूत करू शकते – आदित्य ठाकरे

लोकसभेत महाविकास आघाडीने जिंकून दाखवले, आता विधानसभेतही महाराष्ट्राची हीच एकजूट घटनाबाह्य, भ्रष्ट महायुतीला पराभूत करू शकते, असा विश्वास यावेळी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. पुढच्या काळात आपल्यात भांडणे लावण्याची कामे होतील, पण आपण वेगळे होऊन चालणार नाही, भारतीय जनता पक्ष फक्त एकजूट आणि सत्याला घाबरतो, त्यामुळे हीच ताकद विधानसभेत दिसून आली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

400 पारचा नारा देणाऱया भारतीय जनता पक्षाला देशातील जनतेने 303 वरून 240 वर आणले. आज भाजपचे बहुमताचे सरकार असते तर त्यांनी एका महिन्यात देशाचे संविधान बदलून स्वतःच्या पक्षाचे संविधान देशावर लादले असते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपवाले संविधान बदलणार होते हे फेक नरेटिव्ह नव्हते, तर त्याची प्रक्रिया महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून सुरू झाली होती. भाजपने पक्ष आणि चिन्हे चोरून घटनाबाह्य सरकार स्थापन करून घटनेचा अवमान केला, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. भाजपचे हे कारस्थान महाविकास आघाडीने जनतेपर्यंत पोहोचवले होते, असे ते म्हणाले.

मिंधे सरकार होर्डिंगवर कामे दाखवतेय, ती खरी असतील तर मग निवडणुका का घेत नाही, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. अनेक महानगरपालिकांवर प्रशासक बसवून त्यांच्या माध्यमातून महायुतीने गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र आणि मुंबईची लूट केली, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

मिंधे सरकारने महाराष्ट्रात एकही उद्योग आणला नाही, फक्त 40 चोरांना खोके आणि नोकऱया मिळाल्या आणि राज्यातील तरुण मात्र बेरोजगार आहेत. पोलीस भरतीसाठी 17 लाख तरुण मुंबईत आले, पण नोकऱया कुठे आहेत? पोलिसांच्या घरांसाठीही या सरकारने काहीच निधी दिलेला नाही. लाडका कॉण्ट्रक्टर आणि लाडके राज्य याच योजना मिंधे सरकारने राबवल्या, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.