विदर्भातील शेतकरी असतील, मराठवाड्यातील शेतकरी असतील सर्व हैराण आहेत, त्रस्त आहेत. विचार करतायत हे सरकार कधी बदलणार, हे सरकार 23 तारखेला बदलणार म्हणजे बदलणारच, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. कन्नड विधानसभा मतदारसांघाचे शिवसेनेचे उमेदवार उदयसिंह राजपूत यांच्या प्रचार सभेत आदित्य ठाकरे बोलत होते.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, ”मी गेली दोन वर्ष संपूर्ण महाराष्ट्र फिरत आहे. सरकार पडल्यानंतर जी काही महाराष्ट्राची लूट आहे, जी भाजप एकनाथ शिंदे करत आहेत, ती आपल्याच (जनतेच्या) माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक अडथळे समोर होते, कोविड काळात अर्थचक्र बंद पडलं होतं. उदयसिंहसाहेब याच मतदारसंघात (कन्नड) माझ्याच खात्यातून तीन कोटींचा फंड आणला होता. कारण येथे पर्यटन क्षेत्राला आपल्याला जास्त वाव द्यायचा होता आणि येथे लोकांना आपल्याला पुढे आणायचं होतं. आपलं सरकार पडल्यानंतर त्या फंडाचे पुढे काय झाले, मला माहित नाही. जवळपास असं सगळीकडे झालं आहे. अजिंठा एलोराला मी जवळपास 100 कोटी रुपये दिले होते. त्याला देखील स्थगिती, सगळीकडे स्थगिती, स्थगिती आणि जिथे स्थगिती नाही, तिथे स्वतः खायाला लागले, हे असं सरकार आहे., अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
”जे शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं होतं. माझ्या पंजोबांनी ते नाव माझ्या आजोबांना दिलं होतं, हे नाव आपण सत्तेत आणलं होतं, ते नाव चोरण्याचं पाप एकनाथ शिंदे यांनी केलं. चिन्ह जे माझ्या आजोबांनी निवडलं होतं, जे आपल्या आपल्या सगळ्यांच्या शिवसेनाप्रमुखांनी निवडलं होतं, ते चिन्ह गद्दारांना देण्याचा निवडणूक आयोगाचा काहीही अधिकार बनत नाही. मात्र त्यांनी ते दिलं. वंदनीय हिंदुहृदयसम्राटांचा जो फोटो उद्धव ठाकरे यांनी काढला होता, तो देखील फोटो एकनाथ शिंदे यांनी चोरला. ते इथेच थांबले नाही, सरकारमध्ये बसल्यानंतर चोरी चालूच राहिली.”असे आदित्य ठाकरे म्हणाले.
”प्रचार सभेची सुरुवात मी आपल्या मतदारसंघातून (कन्नड) करत आहे, याचे महत्त्व मला माहित आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, जसं मी प्रचारसभेची सुरुवात येथून करत आहे, विधानभवनात जेव्हा-जेव्हा मी पाय टाकला आहे. मला पहिला चेहरा मला उदयसिंह राजपूत यांच दिसतो. तेही शाळेचे मास्तर असल्यासारखे आधी मला हात पकडून घेऊन जातात की, आधी आपल्याला सही करायची आहे. सरकार आपल्यानंतरही त्यांची गरज मला लागणार आहे. मला आठवतं 2019 ला आपण पहिल्यांदा जेव्हा मला सभेला बोलावलं होतं. तेव्हा अशीच तुफान गर्दी जमली होती. पण तेव्हा लोकं दिसली नाही. कारण लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या होत्या. एवढा पाऊस पडला होता, चिखल झाला होता. मात्र कोणीच येथून हललं नाही. सगळीकडं पाणी भरलं होतं, तरी तुम्ही या पावसासारखेच भरभरून आम्हाला आशीर्वाद दिले, मतदान केलं आणि उदयसिंह राजपूत यांच्यासारखा एक चांगला उमेदवार तुम्ही आमदार केला आणि विधान भवनात पाठवलात’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
”शेतकरी कोणच्या बाजूने उभे राहणार आहेत. ज्या भाजपने तुम्हाला माओवादी म्हटलं आहे, ज्या भाजपने तुम्हाला शहरी नक्षलवादी म्हटलं, अतिरेकी म्हटलं आहे, त्या भाजपसोबत तुम्ही उभे राहणार आहात की, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उभे राहणार आहात. कारण उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुख म्हणून सगळे निर्णय घेतले, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नागपूरमध्ये पहिल्याच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेतले व शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे आदेश दिले. मी तिथेच होतो. सर्व अधिकारी थोडे हलले होते. एक-दोन मंत्री जे होते, ते म्हणाले, मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही हा निर्णय आता का घेत आहेत. आताच तुमचं सरकार बनलं आहे. एक महिनाही झाला नाही. असे निर्णय जे असतात, जे लोकांमध्ये खळबळ निर्माण करतात, असे निर्णय तुम्हाला लोकसभेच्या जवळ 2024 मध्ये, असे निर्णय घ्या. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना स्पष्टपणे संगितलं होतं की, मी निर्णय जो घेतो. ते फक्त निवडणुकीसाठी घेत नाही. माझ्या जनता जनार्दनासाठी घेतो. आज जो मी शब्द दिला आहे, तो मी पाळणार म्हणजे पाळणार. 2019 – 2020 साली आपण जी कर्जमुक्ती जाहीर केली होती, दोन लाखांपर्यंत ज्यांचे ज्यांचे कर्ज होते, ते माफ केले की नाही. या योजेनचे नाव आपण कर्जमाफी ठेवलं नाही. कारण माफ करणारे आपण कोण आहोत, कारण माफी गुन्हेगारांसाठी असते. आपला शेतकरीबांधव हा गुन्हेगार नाही. शेतकरी अन्नदाता असतो आणि अन्न देवो भव, या भावनेने आपण काम करत असतो. कदाचित आम्हाला शेतीतील काही कळत नसेल. पण आज आपला शेतकरी त्रस्त आहे, हैराण आहे, हे आम्हाला कळतं. त्यासाठीच आपण घोषणा केली आहे, जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना करून दाखवली, तशीच कर्जमुक्ती महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आपण करणार म्हणजे करणारच!” अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.
”उद्धवसाहेबांचं सरकार असताना जेव्हा जेव्हा आपल्यावर काही सकंट आले असेल. कुठलीही अडचण असेल, तेव्हा मदत तुमच्या दारी पोहोचवायचे. तुम्ही मला सांगा, भाजप किंवा या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये गेल्या दोन वर्षात जेव्हा जेव्हा आपत्ती आपल्यावर आलीय. कधीही तुम्हाला सरकारकडून मदतीची हाक आली आहे का? आताच या निवडणूका लागण्याआधी, मागच्या महिन्यात बीड जिल्ह्यात फिरत होतो, अंबादासजी, आपण फिरतोय म्हणून घटनाबाह्य मुख्यमंत्री एक-दोन गावांमध्ये गेले, सगळीकडे करू- करू सांगितलं , केलं तर काहीच नाही. आमच्यापुढे राज्याचे कृषीमंत्री होते. कोण हे कृषिमंत्री? पहिले कधी तुमच्या गावामध्ये, शेतात, बांधावर कधी पाहिलं, कधी तुमच्यावर संकट आले, तेव्हा कधी आले का तुमच्या मदतीला. त्याआधी कोण होते, अब्दुल गद्दार यांना कधी तुम्ही पाहिलं का? आहेत ना, तुमच्याच जिल्ह्यातील आहेत. मी जेव्हा सिल्लोडमध्ये गेले होतो. नुकतंच सरकार पडलं होतं. कृषिमंत्री होते, सगळीकडे, असं ताठ मानेने फिरायचे, दादागिरी करायचे. पण त्यांच्याच गावात जेव्हा मी गेलो होतो, तेव्हा कळलं की त्यांच्या गावाच्या बांधावर सुद्धा ते गेले नव्हते. जिथे अवकाळी पाऊस झाला होता, तिथेही ते शेतकऱ्यांच्या मदतीला गेले नव्हते. हे असं चालणार नाही, कृषी खातं, म्हणजे आपलं शेतकऱ्यांचं कुटुंबप्रमुख म्हणून बसलं पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कुटुंबप्रमुख होते आणि असेच हे आपलं महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आपल्यासमोर अनेक विषय पडलेले आहेत. शेतकरी बांधव म्हणून तुम्ही मला सांगा, कापसाला भाव मिळतोय का? सोयाबीनला भाव आहे का? तुम्हाला हमी भाव हवा आहे, तो मिळतोय का? काही मिळत नाही. जे नियमित परतफेड करणारे आहेत. त्यांना काही प्रोत्साहन भत्ता मिळतोय का? हे सगळं होत असताना बी-बियाणे असेल, ट्रॅक्टर वैगरे आहे, त्यावर 18 टक्के जीएसटी, परवडणार आहे का कोणाला? नाही परवडू शकत. विदर्भातील शेतकरी असतील, मराठवाड्यातील शेतकरी असतील, हैराण आहेत, त्रस्त आहेत. विचार करतायत हे सरकार कधी बदलणार, हे सरकार 23 तारखेला बदलणार म्हणजे बदलणारच! हा शब्द मी तुम्हाला देत आहे, असं म्हणत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.