चुकून पुन्हा भाजप मिंध्यांचे सरकार आले तर 1500 चे 150 रुपये होतील, आदित्य ठाकरे यांची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची नाशिक पश्चिम येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी मिंधे भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ”2014 ला जे 15 लाख देणार बोलत होते ते आता 1500 रुपये देत आहेत. जर चुकून पुन्हा यांचे सरकार आले तर त्या 1500 चे पण  दीडशे रुपये होतील, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. नाशिक शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर बडगुजर यांच्या प्रचारासाठी ही सभा पार पडली.

”या शहरात मी अनेकदा आलो. मोर्चे, सभा पहिल्या आहेत. मात्र आजचा क्षण फार महत्त्वाचा असून ही सभा आणि ही निवडणूक ठरवणार आहे की, आपला महाराष्ट्र कुठल्या दिशेने जाणार आहे. आपला महाराष्ट्र अंधारात नेणार की, पुन्हा सुवर्णकाळात नेणार. हे आपण आज ठरवणार आहोत. आपल्याला आज निर्णय घ्यायचा आहे की, येणाऱ्या काळात आपण महाराष्ट्राला कसं पुढे नेणार. अनेक गोष्टी आपण सांगत आणि पाहत आलो आहोत. त्या गोष्टी आपल्या वचननाम्यातही आहे. मात्र ही जी स्वप्न आपण महाराष्ट्रासाठी पाहत आहोत, ती आपल्याला सत्यात उतरवायची आहेत की, आपण स्वप्नांमध्येच राहणार, हे आपल्याला आज ठरवायचं आहे. येथे मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. महायुती सरकार सांगत आहे की, लाडकी बहीण योजना आणून आम्ही प्रत्येक महिलेला 1500 रुपये देत आहोत. हे 1500 रुपये पुरेसे आहेत का?

”2014 मध्ये भाजपवाले 15 लाख रुपये देणार होते. मात्र 2024 मध्ये 15 लाखांचे 1500 रुपये झाले. चुकून पुन्हा भाजप आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार बसलं, तर हेच 1500 रुपये उद्या 15 रुपये होतील. काहीही करण्यामध्ये यांना लाजही वाटत नाही. उत्तर प्रदेशात परवाच योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने जनतेला 300 रुपयांचे चेक वाटले. राज्यातील प्रत्येक महिलेसाठी महाविकास आघाडीने ठरवलं आहे की, फक्त 1500 नाही, तर आम्ही दुप्पट करून 3000 रुपये त्यांच्या खात्यात देणार आहोत. देशात आज जी महागाई आहे, ती परवडणारी नाही. आज आपल्या देशात आणि राज्यात इतकी महागाई आहे की, मार्केटमध्ये तुम्ही गेल्यानंतर 1500 रुपयांत काही मिळत नाही. महिलांसाठी फक्त 1500 रुपये नाही, तर मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे. यातच नाशिक आणि राज्यात जी एसटी बस सेवा आहे, ती प्रत्येक महानगरपालिकेत आपण महिलांसाठी मोफत करणार आहोत. हा निर्णय देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

”आज महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा विषय मोठा झाला आहे. महिलांसोबतच पुरुषांच्या सुरक्षेचा विषयही आहे. यामुळे प्रश्न निर्माण होतो की, या राज्यात गृहमंत्री आहेत की नाही? आज आपल्याला खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला सुरक्षित करायचं असेल, महिलांसाठी सुरक्षा पाहिजे असेल तर महाविकास आघाडीचे सरकार यायला हवे. आपल्या राज्यामध्ये आपण 18000 महिला पोलिसांची आम्ही भरती करणार आहोत. प्रत्येक शहरात महिलांचं खास पोलीस स्टेशन स्थापन करणार आहोत. हे आपल्या महाविकास आघाडीचे काम असेल. येत्या 23 तारखेला आपलं सरकार येणारच, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”देवा भाऊ देवा भाऊ, आपण सगळे मिळून खाऊ ही अशी आपली योजना नाही. आपण जे शेतातून येतं ते खातो. सगळेच शेतकरी आमचे अन्नदाता आहेत. अन्नदाता देवो भव:. ही नेहमीच आमची भावना राहिली आहे. कधी शेतकरी आणि वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणार नाही. मात्र याच एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जरांगे पाटील यांच्यावर लाठीचार्ज केला. तिथे बसलेल्या महिलांवर आणि वारकऱ्यांवर याच एकनाथ शिंदे सरकारने लाठीचार्ज केला. देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. तर केंद्रातील मोदी सरकारने दिल्लीकडे जाणाऱ्या मोर्चा घेऊन निघालेल्या शेतकऱ्यांना अतिरेकी म्हटले. त्यांच्यावर अश्रुधूर सोडत लाठीचार्ज करत गोळीबार देखील केला. आपण आपल्या राज्यात औषध बनवण्याचा ड्रग पार्क आणणार होतो. मात्र भाजपने नाशिकमध्ये फक्त ड्रग्ज केलं आहे. इथे ड्रग्जमुळे तरुण पिढी वाया जात असून कायदा सुव्यवस्थे इथली परिस्थिती अत्यंत खराब आहे. कधी पोलीस, कधी महिला तर कधी पुरुषांवर हल्ला होतो. ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. ही अशी परिस्थिती असताना भाजप कुठच्या तोंडाने महिलांना जाऊन सांगणार आहे की, 1500 रुपये देतो आम्हाला मतदान करा. याच भाजपने कर्नाटकात रेवन्ना नावाच्या एका राक्षसाचा प्रचार केला. ज्याने 2500 महिलांवर अत्याचार केला. फोनवर त्यांचे व्हिडिओ काढले. याच भाजपला तुम्ही मतदान करणार का? असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”ज्या भाजपला गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राचा विसर पडला आहे. आता त्यांना लाडकी बहीण, लाडके भाऊ आठवत आहेत. मात्र गेल्या दोन वर्षात त्यांना महाराष्ट्राच्या रस्त्यावर फिरणारे बेरोजगार तरुण-तरुणी दिसले नाहीत. आज सगळीकडे ड्रग्ज, स्क्रॅप माफिया फिरत आहेत. पण ज्या राज्यात तुम्ही गद्दारी करून, उद्धवसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडून तुमचं राज्य स्थापित केलं. खोके सरकार सरकार आणलं. त्या महाराष्ट्राला तुम्ही काय दिलं? असा मी प्रश्न विचारतो तेव्हा हे भाजपवाले आणि एकनाथ शिंदे गॅंगवाले पळतात, समोर येऊन उत्तर देत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”ज्या भाजपला गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राचा विसर पडला आहे. आता त्यांना लाडकी बहीण, लाडके भाऊ आठवत आहेत. मात्र गेल्या दोन वर्षात त्यांना महाराष्ट्राच्या रस्त्यावर फिरणारे बेरोजगार तरुण-तरुणी दिसले नाहीत. आज सगळीकडे ड्रग्ज, स्क्रॅप माफिया फिरत आहेत. पण ज्या राज्यात तुम्ही गद्दारी करून, उद्धवसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडून तुमचं राज्य स्थापित केलं. खोके सरकार सरकार आणलं. त्या महाराष्ट्राला तुम्ही काय दिलं? असा मी प्रश्न विचारतो तेव्हा हे भाजपवाले आणि एकनाथ शिंदे गॅंगवाले पळतात, समोर येऊन उत्तर देत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.