
देशविदेशातील कंपन्यांना गेल्या 53 वर्षांपासून पेटंट देणाऱ्या मुंबईतील पेटंट विभागाचे मुख्यालय दिल्लीतील द्वारका येथे हलविण्यात आले आहे. मंगळवार 25 फेब्रुवारीपासून दिल्लीत हे कार्यालय सुरू झाल्याचे उद्योग विभागाकडून सांगण्यात आले. पेटंट विभागातील काही मोजके अधिकारी मुंबईतील अँटॉप हिल येथील कार्यालयात काम करणार असून मुख्य व्यवस्थापकांची दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्या कंपन्यांना पेटंट घ्यायचे असेल त्यांना मुंबई ऐवजी दिल्लीतील कार्यालयात जावे लागणार आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला फटकारले आहे.
मुंबईतील पेटंट विभाग हा केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. या विभागाचे मुख्यालय गेल्या 53 वर्षांपासून मुंबईतील अँटॉप हिल येथे आहे. या कार्यालयाच्या अंतर्गत दिल्ली, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, नागपूर येथील कार्यालयाचा कारभार पाहिला जात होता. आता हेच मुख्यालय दिल्लीतील द्वारका येथे हलविण्यात आले आहे.
यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. ”शेवटी खोटं बोलून, रेटून पुन्हा ह्यांनी तेच केलं… मुंबईचं महत्व कमी करणं हाच यांचा उद्देश आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.