लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत दिलेले मिहिर कोटेचा आणि पियूष गोयल हे उमेदवार भाजपची लाइन पाळणारे आहेत. मुंबई आणि मुंबईकरांना उद्ध्वस्त करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. एकाने मिंध्यांनी होऊ घातलेला शेकडो कोटींचा स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला, तर दुसरा गरीब झोपडीवासीयांना बेघर करायला निघाला आहे असा घणाघात करतानाच, मुंबईकरांच्या मुळावर उठलेल्या भाजपला दिल्लीपासून दूर ठेवा, असे आवाहन शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज तमाम मुंबईकरांना केले.
आदित्य ठाकरे यांनी आज विक्रोळीतील मध्यवर्ती शिवसेना शाखा तसेच मानखुर्दमधील शिवाजीनगर शिवसेना शाखेला भेट देऊन जनतेशी संवाद साधला. यावेळी भाजप आणि महायुतीवर त्यांनी सडकून टीका केली. देशात हुकूमशाहीविरुद्ध परिवर्तनाची लाट आहे. महाराष्ट्रात परिवर्तन घडणार की नाही असे त्यांनी विचारताच, उपस्थितांनी होकार दर्शवत शिवसेनेचा जयघोष केला.
भाजपने उत्तर व उत्तर पूर्व मुंबईतून पियूष गोयल आणि मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा समाचार आदित्य ठाकरे यांनी घेतला. शिवसेनेने पालिकेचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा बाहेर काढला तेव्हा त्याचे श्रेय घेण्यासाठी कोटेचा यांनी विधिमंडळात आपणच हा घोटाळा बाहेर काढला आणि त्याचे टेंडर रद्द केल्याचेही सांगितले. मात्र टेंडर रद्द झालेच नसून कोटेचा यांनी सभागृहात खोटे सांगणे म्हणजे हक्कभंग आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. असे खोटे बोलणारे उमेदवार यदाकदाचित जिंकलेच तर जनतेशीही खोटे बोलतील. म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
दुसरे उमेदवार पियूष गोयल हे मुंबईतील झोपडीवासीयांना बेघर करायला उठले आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडीवासीयांना हक्काचे घर मिळावे म्हणून एसआरए योजना आणली. पण गोयल म्हणतात, मुंबईतील झोपडय़ा हटवून त्यांना मिठागरांवर पाठवून द्यायचे. हे दोन्ही उमेदवार निवडून द्यायचे नाहीत अशी शपथ घेतली पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
यावेळी उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटील, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील राऊत, रमेश कोरगावकर, विभागप्रमुख दत्ता दळवी आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मनसेचे पदाधिकारी दिनेश कोपरकर, अक्षय नागरे पाटील, शुभम नाचरे, अमोल जाधव, प्रथम कोपरकर यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
ईडी सोबत असूनही महायुतीला उमेदवार मिळत नाहीत
शिवसेनेबरोबर असताना भाजपा निश्चिंत होती. आता टेन्शनमध्ये आहे. कारण भाजप, मिंधे गट आणि राष्ट्रवादीतल्या गद्दार गटाबरोबरच ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स असे सहा पक्ष एकत्र येऊनही महायुतीला उमेदवार मिळत नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
दहा वर्षांत 25 बडय़ा नेत्यांवर ईडीच्या धाडी
दहा वर्षांत 25 मोठय़ा नेत्यांवर ईडी, आयटी, सीबीआयच्या धाडी पडल्या. त्यातील 23 नेत्यांनी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये उडी मारल्यावर त्यांच्या केसेस बाजूला ठेवल्या. मिंध्यांचे सरदारही जेलवारी टाळण्यासाठीच भाजपात गेल्याची टीकाही त्यांनी केली.
मंत्रालय गुजरातमधून चालेल अशी भीती वाटतेय
बोरीवलीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात गुजराती पाटय़ा दिसताहेत. आपले गुजरातशी भांडण नाही; पण आपली संस्कृती पुसून उद्या मंत्रालयही अहमदाबाद किंवा सुरतमधून चालवतील अशी भीती वाटतेय, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मिंध्यांना विचारतो… क्या होगा तुम्हारा?
पाच उमेदवार बदला असे आदेश भाजपने मिंधे गटाला दिले आहेत. आता काय होणार त्या गद्दारांचे? त्यांचे करिअर काय? मीच विचारतो मिंध्यांना…क्या होगा तुम्हारा? अशी खिल्ली यावेळी आदित्य ठाकरे यांनी उडवली.
संजय राऊत यांच्याबद्दल देशभरात आदर
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या शिवसेनेवरील निष्ठsचा दाखला यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला. शिवसेनेतील अनेकांना भाजपने आपल्या पक्षात येण्यासाठी धमक्या दिल्या, पण त्यांनी पक्ष सोडला नाही. संजय राऊत हे याचे जिवंत उदाहरण आहे. भाजपच्या हुकूमशाहीविरुद्ध लढताना जेलमध्ये जावे लागले तरीही संजय राऊत यांनी शिवसेना सोडली नाही आणि तुरुंगातून परतल्यानंतरही भाजपशी दोन हात करत आहेत याबद्दल देशभरात त्यांच्याबद्दल आदर आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ज्याला आपण निवडून देऊ त्याने महाराष्ट्रहित जपलेच पाहिजे. महाराष्ट्रहित म्हणजेच राष्ट्रहित आहे. महाराष्ट्रासाठी लढणाऱया शिवसेनेची मशाल घरोघरी गेली पाहिजे, कारण या मशालीनेच प्रत्येक घरातील चूल पेटणार आहे.