लोकसभेतील पराभवानंतर मिंधे गँग, भाजप व अजित पवार गटातून अनेक जण बाहेर पडतील. पण जे गद्दार आहेत, पक्ष चोर आहेत, त्यांना आम्ही पुन्हा पक्षात घेणार नाही असे आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. राज्यातील हे सरकार फक्त सहा महिन्यांचे आहे. नोव्हेंबरला आपल्याला आपलं सरकार बसवायचे आहे. लोकसभा निवडणूक ही फक्त नांदी आहे. आज आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यापेक्षा मोठा मेळावा घ्यायचा आहे. आता खासदार आणि आमदार मिळून विजयी मेळावा साजरा करूया, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
जबाबदाऱया वाटून घेऊ
शिवसेनेची सदस्य नोंदणी सुरू झाली त्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, आजपासून आपल्या जबाबदाऱया वाटून घ्यायच्या आहेत. जास्त जबाबदाऱया घेऊ नका, फक्त नोंदणी करा असे आवाहन त्यांनी केले.विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱयांना मार्गदर्शन व विजयी मेळावा भायखळ्यात आयोजित करण्यात आला होता. या सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, उपनेते रवींद्र मिर्लेकर, सचिन अहिर, अशोक धात्रक, मनोज जामसुतकर, राजकुमार बाफना, उपनेत्या किशोरी पेडणेकर, विभाग संघटक श्रद्धा जाधव, माजी महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून दणदणीत विजय मिळविणारे नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत यांचा यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे सरकार फक्त सहा ते आठ महिनेच आहे. ज्यांना-ज्यांना वाटत आहे, मिंधे सरकारने घोळ केला आहे ते बाहेर पडतील. महाराष्ट्र प्रेमी अनेक खासदार बाहेर पडतील. भाजपची संसदीय मंडळाची बैठक झाली नाही. पण इंडिया आघाडीची बैठक झाली आहे. भाजपचे जे दोन मित्र पक्ष आहेत त्यांना सांगतो की लोकसभा अध्यक्ष तुमचा बनवा नाही तर भाजपचा लोकसभा अध्यक्ष झाल्यास पहिला तुमचा पक्ष फोडतील.
रिल मंत्री की रेल मंत्री?
भाजपने महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेल्या विधानसभा प्रभारींचा उल्लेख करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आजच पेंद्रीय मंत्र्यांना भाजपने प्रभारी केले आहे. ज्या मंत्र्यांच्या अखत्यारित एवढे मोठे रेल्वे खाते येते त्या रेल्वेचे गेल्या सहा ते आठ महिन्यांत अनेक अपघात झाले. आज सकाळीही रेल्वेचा एक अपघात झाला, पण हे फक्त वंदे भारतचे पह्टो टाकत असतात बाकी काम शून्य. हे रिल मंत्री आहेत की रेल मंत्री आहेत हेच कळत नाही. ना धड रेल्वे खातं सांभाळू शकतील नाही भाजप सांभाळू शकतील, असा सणसणीत टोला यावेळी आदित्य ठाकरे यांनी मारला