ज्यांना आम्ही परिवारातले समजायचो. काहींना आम्ही काका म्हणायचो. त्यांच्या मुलांना मित्र मानायचो. त्यांना आम्ही परिवारातले समजायचो. बरोबर ऐनवेळी त्यांना खोके दिसले आणि त्याला त्यांनी ओके म्हटले आणि रातोरात आपले होते ते परके झाले. ते सगळे पळाले. तसेच एक गद्दार इकडे आहेत. नाटक करणारे गद्दार आहेत, रडणारे गद्दार आहेत. आवाज चढवून बोलणारे गद्दार आहेत. शिवीगाळ करणारे गद्दार आहेत. धमकवणारे गद्दार आहेत. या गद्दाराला, चिंधीचोराला तुम्ही घाबरणार आहात का? या गुंडाना तुम्ही घाबरणार आहात का? मी असेच मतदारसंघ निवडलेत जिथे गल्लीतील गुंड स्वताला डॉन समजतात. आम्ही दिल्लीश्वरांशी लढतोय. गुजरातवरून होणाऱ्या आक्रमणाशी लढतोय. जे जे आमच्या लोकांवर दादागिरी करतील त्यांच्याशी लढतोय. तुमच्यावर कोणी दादागिरी करणाऱ्याचा प्रयत्न केला, हात उचलण्याचा प्रयत्न केला तर आपलं सरकार येतयं. त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी असेल, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी गद्दारांसह विरोधकांना दिला आहे. ते आज दापोलीतील आझाद मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारात बोलत होते.
पुढे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी आम्हाला वर्षा बंगला सोडायचा होता त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून अलीबाबा आणि चाळीस चोर कसे पळाले हे सांगितले तेव्हा ते म्हणाले की, मी आता वर्षा बंगला सोडतोय. कदाचित पदही सोडावं लागेल. फेसबुक लाईव्ह संपल्यानंतर मी त्यांना विचारले आता पुढे काय? तेव्हा ते म्हणाले की, चला बॅगा भरा, मातोश्रीवर जायचं आहे. तेव्हा वर्षा बंगल्यावरील सर्वांना भरून आलं होतं. काही जण रडतं होते. दुसरा कोणता राजकारणी असता तर पदाला चिकटून बसला असता मात्र उद्धव ठाकरे तसे नाहीत. मातोश्रीवर आल्यावर त्यांनी मला सांगितलं की चला मैदानात उतरायचं आहे. आता लढायला सुरूवात कर, स्वत:साठी नाही महाराष्ट्रासाठी लढायचे आहे.
आताच्या उद्योगमंत्र्यांचे डांबर उद्योग
आपलं सरकार असताना विविध प्रकल्प आणण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो. मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण प्रकल्प आणत होतो. तेव्हाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे काम जगासमोर आहे. नाहीतर आत्ताचे उद्योगमंत्री त्यांचा डांबर सोडून काय उद्योग आहे हे कुणाला माहित नाही असा टोला आदित्य ठाकरे यांनी हाणला. आपल्या अडीच वर्षाच्या काळात साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आपण राज्यात आणली होती. कोरोनाचा काळ होता मात्र उद्योगपतींचा एकाच व्यक्तीवर विश्वास होता तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर. आम्ही कधीही कामगारांना वाऱ्यावर सोडलं नव्हते. केंद्र सरकारने कामगार आणि शेतकऱ्यांच्या विरोधात जे काळे कायदे आणले होते त्याचा आपण विरोध केला होता. आज आपल्या राज्यात नवीन गुंतवणूक येत नाही, नवीन रोजगार नाही. आहे तो रोजगार जातोय. आम्हाला उद्योगपती पण महत्वाचे आहेत आणि कामगार पण महत्वाचे आहेत. उद्योगपती असतील तर कामगार आहेत आणि कामगार असतील तर उद्योगपती राहतील असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आपले हिंदुत्व हृदयात राम…हाताला काम
आज सर्वत्र तरूण वर्ग रोजगाराचा प्रश्न विचारतोय. हे तरूण कुठेही माथ्यावर मी हिंदू आहे, मी मुस्लीम आहे, मी ख्रिश्चन आहे, मी पारसी आहे असे लिहून येत नाही. तर ते नोकरीसाठी येतात, रोजगारासाठी येतात. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो आपले हिंदुत्व स्पष्ट आहे. हृदयात राम आणि हाताला काम. भाजप, एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्व घरं जाळणारं आहे आपलं हिंदुत्व चुली पेटवणारं आहे असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव,उमेदवार संजय कदम,अमोल किर्तीकर,सदानंद कदम,जिल्हा सहसंपर्क प्रमुख सचिन कदम,माजी आमदार चंद्रकांत मोकल,तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, संदीप चव्हाण , माजी जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव, सचिन तोडणकर, अरूणा आंब्रे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.त्यामध्ये माजी जि.प.अध्यक्ष शंकर कांगणे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते मुजीब रूमाणे, खलीद रखांगे, विलास शिगवण, अविनाश केळसकर, आश्विनी लांजेकर, सविता नलावडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
आपले सरकार आल्यानंतर राज्यात उद्योगधंदे आणूच पण राज्यातील बेरोजगारांना आपण चार हजार रूपये बेरोजगारी भत्ता देणार आहोत. जसं मुलींना मोफत शिक्षण आहे तसचं दर्जेदार शिक्षण मुलांना मोफत देणार आहोत. महिलांना लाडकी बहीणीचे 1500 रूपये देतात. हे 2014 ला 15 लाख रूपये देणार होते. मग आता किती शून्य कमी केले असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. 1500 रूपयात काही परवडत नाही म्हणून आपली महालक्ष्मी योजना येणार त्यामध्ये महिलांना दरमहा तीन हजार रूपये देण्यात येणार आहेत. महिलांना एसटी आणि बेस्ट च्या बसमधून मोफत प्रवास करता येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
हे तुमचे लाडके भाऊ आहेत का?
या सरकारमधील अब्दुल सत्तार, संजय राठोड सारखे मंत्री तुमचे लाडके भाऊ आहेत का? अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंना काय म्हणाले होते हे आम्ही पाहिलयं. महिलांचा अपमान करणारे तुमचे लाडके भाऊ आहेत का? गौरी लंकेश यांचा खून करणाऱ्याला त्यांनी पक्षात घेतले ते तुमचे लाडके भाऊ आहेत का? बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांना त्यांनी पक्षात घेतले ते तुमचे लाडके भाऊ आहेत का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
धनशक्ती विरूध्द जनशक्तीची लढाई – भास्कर जाधव
शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले की, ही निवडणूक धनशक्ती विरूध्द जनशक्तीची आहे. तुमची सर्वांची जनशक्ती ही धनशक्तीला पराभूत करेल. रामदास कदम विकास केला सांगतात जरा खेड-दापोली रस्त्यावरून जाऊन बंधा मग कळेल की काय विकास झालाय? असा टोला भास्कर जाधव यांनी हाणला.