अमित शहांना या अपमानाची माफी मागावीच लागेल – आदित्य ठाकरे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अमित शहांविरोधात गुरुवारी देशाच्या संसदेत व महाराष्ट्रातील विधानभवनात देखील आंदोलनं झाली. या आंदोलना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी अमित शहा व भाजपवर निशाणा साधला. तसेच आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत अमित शहा यांना या प्रकरणी माफी मागावीच लागेल, असे ठणकावून सांगितले.

”देशाची जनता रस्त्यावर उतरली आहे. हा अपमान महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही तर देशाच्या जनतेचा, संविधानाचा अपमान झाला आहे. आठवले, चंद्राबाबू, नितीश कुमार या अपमानानंतर भाजपसोबत राहणार आहेत का? अनेक आमदार आज इथे आहेत जे बाबासाहेब आंबेडकर यांना मानतात. जे स्वत:ला आंबेडकररवादी मानतात. ते भाजपसोबत राहणार आहेत का? बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान जालाय त्या वपिरोधात, आम्ही रस्त्यावर उतरतोय. ही भाजपची मानसिकता आहे. जर त्यांच्या मनात असतं तर माफी मागून मोकळे झाले असते. चूक अनेक लोकं करतात ते माफी मागून मोकळे होतात. मी लोकसभेपासून सांगत होतो की भाजपचा संविधानाविषयी राग आहे तो यांच्या भाषणातून दिसून आला आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.’

”बाबासाहेबांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आहे. या अपमानामुळे तमाम संविधानप्रेमी दुखावले आहेत. केंद्रीय गृहमंत्री महोदयांना ह्या अपमानाची माफी मागावीच लागेल”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.