महाराजांचा एकेरी उल्लेख करणं, औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणणं महाराष्ट्राचा अपमान; आदित्य ठाकरे कडाडले

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त देशाचे गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी किल्ले रायगडावर आले होते. यावेळी रायगडावरून केलेल्या भाषणात शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, तसेच औरंगजेबाच्या कबरीला ‘समाधी’ म्हणाले. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला.

रविवारी शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांना माध्यम प्रतिनिधींनी शहांच्या विधानाबाबत प्रश्न विचारला. याला उत्तर देताना ते म्हणाले की, भाजपची हीच भूमिका राहिली आहे. जसे महाराष्ट्रावर मुघल, अफझलखान वगैरे आक्रमण करत राहिले तीच महाराष्ट्र लुटण्याची मानसिकता भाजपची आहे.

महाराष्ट्रावर जो चालून येईल त्याला असेच गाडले जाईल, त्याच औरंगजेबाची कबर काही लोकांना समाधी वाटते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखही एकेरी केला. आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवतात ते आता कुठे गेले? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच महाराजांचा एकेरी उल्लेख करणे, औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान असून तो गृहमंत्र्यांनी केला आहे, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.

शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या, औरंग्याच्या थडग्याला ‘समाधी’ म्हणणाऱ्यांचा फडणवीस कडेलोट करणार का? – संजय राऊत