मुंबईची आर्थिक हत्या करून भाजप आसुरी आनंद घेतोय, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

मुंबईची आर्थिक हत्या करून भारतीय जनता पक्ष आसुरी आनंद घेतोय, त्याला कुठेतरी रोखावेच घालेल, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. शिवसेनेचे मुंबईतील नेते, उपनेते, पदाधिकारी, युवासेना आणि महिला आघाडीची शिवसेना भवन येथे बैठक झाली. या बैठकीनंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

गेल्या सहा-सात महिन्यांपासून आम्ही मुंबईच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा लावून धरलेला आहे. गढूळ पाणी असो कमी दाबाने सुटणारे पाणी असो किंवा ऐन उन्हाळ्यात टँकर असोसिएशनने पुकारलेला संप असो. टँकर असोसिएशनने एक आठवड्याची नोटीस देऊनही सरकार हलले नाही. मुंबई महापालिकेचे प्रशासक मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर चालतात, मुंबईची आर्थिक हत्या होत असतानाही त्याकडे लक्ष दिले नाही, यासारखे दुर्दैव नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

टँकर असोसिएशनच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आम्ही 48 तासांची डेडलाईन दिली होती. ही डेडलाईन आता संपत आली आहे. त्यामुळे या आठवड्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि मुंबईकर वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढून जाब विचारणार आहेत, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, टँकर असोसिएशनच्या मागण्या गेल्या दोन-तीन वर्षापासून असून महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्राने लावलेली नियमावली आम्ही लागू करणार नाही असे सांगितले होते. काही शहरांमध्ये ती लागू होऊ शकते, तर काही नाही. त्यामुळे काही मागण्या रास्त आहेत. पण मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून बेस्टचे हाल, कचरा कर लावणे आणि पाण्याची समस्या निर्माण करून भाजप जो आसुरी आनंद घेतोय त्याला कुठेतरी रोखावे लागेल.

तिसऱ्या दिवशीही मुंबईकरांचे हाल, व्यावसायिकांची कोंडी; टँकरचालकांचा संप सुरूच

संपामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. गेले तीन दिवस महावीर जयंती, हनुमान जयंती आणि उद्या आंबेडकर जयंती साजरी करत असताना अनेकांच्या घरी पाणी नाही. मोठा विकेंड असल्याने अनेक मुंबईकर बाहेर गेल्याने थोडे सांभाळू शकतो, पण उद्या मुंबईकर कामावर रुजू होताना अंघोळीच्या पाण्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. अनेक हाय रेज सोसायट्यांना वाटते की एसआरएने पाणी घेतले, एसआरएला वाटते चाळींनी घेतले, चाळींना वाटते हाय रेज सोसायट्यांनी घेतले. यामुळे सामाजिक वाद निर्माण होऊ लागले असून अनेक इमारतींनी फायर टँकमधील पाणी वापरायला सुरुवात केली आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.