हलके असल्यानेच सूरत, गुवाहाटीपर्यंत वाहत गेले! आदित्य ठाकरे यांचा मिंधेंवर निशाणा

हलक्यात घेतल्याने सरकार पाडले असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री मिंधेंवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. हलके असल्यानेच सूरत, गुवाहाटीपर्यंत वाहत गेले, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

गेवराई विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बदामराव पंडीत यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचले तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, ते एवढे हलके होते की वाहत सूरत, गुवाहाटीपर्यंत गेले. एवढेच नाही तर गद्दारांनी सरकार पाडल्याचेही मान्य केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरच्या तपासणीवरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. विरोधी पक्षांच्या नेत्यांचीच तपासणी होत आहे. एवढेच नाही तर अनेक शहरांमध्ये राजकारणाशीही संबंध नसलेल्या सामान्य लोकांनाही त्रास दिला जात आहे. आमची तपासणी करा, पण मोदींचीही करा. मिंधेंचेही करा. त्यांच्या हेलिकॉप्टरमधून जातात त्या बॅगा नक्की कुणाच्या असतात? असा सवाल करत प्रत्येकाने तपासणी सुरू असताना व्हिडीओ काढावा, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी फोटोमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला लाथ मारली. ते फुटबॉलमध्ये असायला हवे होते अशी मिश्कील टिप्पणी आदित्य ठाकरे यांनी केली. ते पुढे म्हणाले की, कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत करतात. त्यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे. त्यांना लाथ मारणे, धक्काबुक्की करणे कितपत योग्य आहे? भाजपला निवडून द्यायचे का याचाही विचार कार्यकर्त्यांनी करावा. कारण गेल्या दोन वर्षात ना भाजप कार्यकर्त्यांचा सन्मान झाला, ना संघाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला.

मिंधेंना ‘गद्दार’ घोषणा झोंबली, तरुणाला दमदाटी; साकीनाका येथील व्हिडीओ व्हायरल

भाजपचे हिंदुत्व चुनावी हिंदुत्व असल्याचे पुनरुच्चारही आदित्य ठाकरे यांनी केला. बांधकाम पूर्ण झालेले नसतानाही निवडणुकीआधी राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. बांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार होत असतानाही जय शहा बांगलादेशसोबत क्रिकेट खेळतात. त्यामुळे भाजपच्या हिंदुत्वावर किती विश्वास ठेवायचा, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केली.