कालचं सेलिब्रेशन हा BCCI साठी स्पष्ट संदेश, वर्ल्डकप फायनल मुंबईतच हवी! आदित्य ठाकरे गरजले

टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाचे गुरुवारी मुंबईत अभूतपूर्व स्वागत झाले. रोहित सेनेच्या स्वागतासाठी मरीन लाईन्सच्या समुद्रकिनारी मुंबई व उपनगरातील क्रीडाप्रेमींचा महासागर लोटला होता. यावेळी नरीमन पॉइंट ते वानखेडे मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीने गर्दीचे विक्रम मोडले. दर्दी क्रीडाप्रेमींच्या याच गर्दीचा अन् सेलिब्रेशनचा उल्लेख करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईला डावलून अहमदाबाद येथे 2023 चा वन डे वर्ल्डकपची फायनल घेणाऱ्या बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बीसीसीआयवर टीका केली. काल मुंबईत विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी झालेलं सेलिब्रेशन हा बीसीसीआयसाठी स्पष्ट संदेश होता. वर्ल्डकपची फायनल कधीही मुंबईबाहेर ठेऊ नका, असा इशाराच आदित्य ठाकरे यांनी दिला.

तब्बल 13 वर्षांची जगज्जेतेपदाची प्रतीक्षा हिंदुस्थानी संघाने 29 जूनला संपवली होती आणि अब्जावधी हिंदुस्थानींना टी-20 वर्ल्ड कप रूपाने जगज्जेतेपदाची अनमोल भेट दिली होती. मुंबईकरांनी आपल्या लौकिकास साजेशा स्पिरिटने चॅम्पियन्सचे स्वागत करत हे जगज्जेतेपद किती स्पेशल आहे हे दाखवून दिले. दीड तासाच्या अफाट आणि अचाट विजययात्रेत क्रिकेटप्रेमात भिजल्यानंतर जगज्जेत्यांचे वानखेडेवरही त्याच जल्लोषात स्वागत करण्यात आले. तब्बल सहा तास वाट पाहत असलेले क्रिकेटप्रेमी जगज्जेत्या हिंदुस्थानची पहिली झलक पाहून अक्षरशः भारावले. गेले सहा तास ते नाचत होते तर वानखेडेवर जगज्जेत्यांचा नृत्यानंद पाहून त्यांचीही पावले पुन्हा थिरकली.

तब्बल 28 वर्षांनंतर 2011 साली हिंदुस्थानी संघाने आयसीसी वर्ल्ड कप जिंकला तेव्हा धोनीच्या संघाने वानखेडेवर विजयी अभिवादन केले होते. वानखेडेचा फेरा मारला होता. त्याआधी 2007 च्या जगज्जेतेपदानंतरही जगज्जेत्या संघाने आपला विजय सोहळा वानखेडेवरच साजरा केला होता. आज पुन्हा तोच विजय सोहळा आणि तशीच विजयी परेड वानखेडेला अनुभवायला मिळाली. हिंदुस्थानच्या जगज्जेत्यांना वर्ल्ड कपसह आपला आनंद साजरा करत क्रिकेटप्रेमींचे आभार मानले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)