शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बेस्टचे व्यवस्थापक अनिव डिग्गीकर यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांचा मतदारसंघातील बेस्ट बसेसच्या समस्याविषयी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी पालिकेकडून बेस्टला अर्थसहाय्य का मिळत नाही, असा सवाल देखील केला.
” बेस्ट आणि आमचं एक आपुलकीचं नातं आहे. बेस्ट ही मुंबईची लाईफलाईन आहे. आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा बस स्टॉपवरचे बस शेल्टर सुरक्षित, चांगले करणार होतो. आताचे बस स्टॉप हे होर्डिंग सारखे होत आहे. दहा हजार इलेक्ट्रिक बसेसचा ताफा येणार होत्या. त्यात 900 डबलडेकर बसेस होत्या. त्याच वेळी सरकार बदललं आणि सगळ्याला फुलस्टॉप लागला. यात बेस्टची चूक नाही. बेस्ट त्यांची कामगिरी व्यवस्थित करत असते. पावसाळ्यात ट्रेन थांबतात पण बस थांबत नाही. बेस्टला बीएमसीकडून अर्थसहाय्य मिळणं हे महत्त्वाचं आहे. जर बेस्ट एमएमआरडीएला 5 हजार कोटी देऊ शकते मग बेस्टला का नाही. बेस्टला अर्थसहाय्य देणं गरजेचं आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी लाडका भाऊ योजनेत जर भावांना दहा हजार रुपये दिले जात आहेत. तर महिलांना देखील दहा हजार का नाही, असा देखील सवाल केला आहे.
”गडावर जे अतिक्रमन आहे ते गेलंच पाहिजे यात कोणाचंही दुमत नाही. विशाळगड घटनेवर राजकारण होऊ नये. पायथ्याशी व गडावर जे हिंसक आंदोलन झालं तेव्हा पोलीस व अधिकारी कुठे होते. ही सगळी उत्तर राज्य सरकारने दिली पाहिजे. बाहेरची लोकं येऊन कोल्हापूरात हिंसाचार करून गेली. हे अतिक्रमन वगैरे यांना निवडणूकीच्या तोंडावर अचानक का आठवलं आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.