कोळीवाड्यांचं क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ देणार नाही, ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीची होळी करू; आदित्य ठाकरेंचा इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीवरून मिंधे सरकारला फटकारले आहे. या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्याच दिवशी मिंधे सरकारच्या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीची होळी करू असे आश्वासन दिले आहे. तसेच भाजपच्या ज्या आमदारांच्या मतदारसंघात कोळीवाडे येतात त्यांची क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत काय भूमिका आहे ती स्पष्ट करण्याची मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली.

”छत्रपती शिवाजी महाराज मंडई येथे गेली अनेक वर्ष कोळी बांधव मासे विकत आहे. कुठेतरी पीयूष गोयल सारखे लोकं आहेत ज्यांना माशांचा त्रास होतो, वास सहन होत नाही अशा लोकांनी त्या जागांवर नजर ठेवून असे भुखंड बिल्डरला द्यायचं ठरवलं आहे. यांना मराठी माणसाला, कोळी बांधवांना इथे राहू द्यायचं आहे का? आता पर्यंत यांनी मुंबईतील तब्बल 1080 एकर जमीन फुकटात अदानीला दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंडई ही देखील कोळी बांधवांच्या हातून काढून घेतली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे यांनी महाराष्ट्रात आणलेली ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी. या पॉलिसीनुसार हे गावठाण आणि कोळीवाड्यांचे क्लस्टर डेव्हलपमेंट करणार . एसआरएला गोंडस नाव म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट. स्लम असतो तिथे एसआरए होतं. जिथे स्लम्स नसतात.तिथे वेगवेगळे प्लॉट एकत्र करून तशीच एक बिल्डिंग बांधणार व सगळ्या कोळीवाड्यातील लोकांना तिथे राहायला पाठवणार. जिकडे जिकडे कोळीवाडे आहेत तिथे भाजप एकनाथ शिंदेंच्या राजवाटीने क्लस्टर डेव्हलपमेंट करायचे ठरवले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

”महाविकास आघाडीच्या काळात मी कोळीवाड्यांच्या सिमांकनावर चार पाच बैठका घेतल्या होत्या. पण ते सिमांकन यांनी थांबवले असून आता यांनी क्लस्टर डेव्हलपमेंट आणले आहे. जे आता बंगल्यात राहतात. एकरात ज्यांची जागा आहे त्यांना स्क्वेअर फूटात डांबलं जाणार आहे. त्यानंतर राहिलेली मोक्याची समुद्र किनाऱ्याची जागा ती बिल्डरला दिली जाणार. अशी ही जी पॉलिसी आहे ती कुठल्या बिल्डरने बनवली त्याचं नाव समोर आलंच पाहिजे. तसंच या भाजप मिंध्यांचे जे स्थानिक आमदार आहेत ज्यांच्या मतदारसंघात कोळीवाडे आहेत त्यांची याबाबतची नक्की भूमिका काय आहे ते पण त्यांनी स्पष्ट करावी, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

” मिंधे सरकारने आणलेले हे क्लस्टर डेव्हलपमेंट आम्ही होऊ देणार नाही. आम्ही कोळीवाड्यांचे सेल्फ रिडेव्हलमेंट करणार. तुम्ही जिथे आहात. तिथेच तुम्हाला घरं देणार. आमचं सरकार बनवल्यानंतर आम्ही पहिल्या दिवशी ड्राफ्ट हाऊसिंगची होळी केल्याशिवाय राहणार नाही. क्लस्टर डेव्हलमेंट करून तुम्ही कोळ्यांचे उद्योग मारतायत, मासेविक्रेत्यांना हलवताय हे आम्ही होऊ देणार नाही”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.