महाराष्ट्रात येणारे प्रकल्प गुजरात व अन्य राज्यांत घालवलेत त्याचे प्रायश्चित्त म्हणून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर (एमटीएचएल) टोल लावू नका, असे आव्हान शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
आदित्य ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वेदांत फॉक्सकॉन, एअरबस टाटा, मेडिकल डिव्हाईस पार्क, बल्क ड्रग पार्क हे मोठे प्रकल्प खोके सरकारमुळे महाराष्ट्राबाहेर गेले. टेस्ला व सबमरीन प्रकल्पाबाबतही तसेच कानावर येत आहे. प्रकल्पांसाठी सगळा खर्च मुंबई, महाराष्ट्राकडून घ्यायचा आणि त्यातून येणारे उत्पन्न किंवा उद्योग गुजरातला पाठवायचे हे धोरण घटनाबाह्य सरकारचे राहिलेले आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी या वेळी केला.
रेसकोर्सची जागा बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही
महालक्ष्मी येथील रेसकोर्सही हलवण्याचा प्रयत्न मिंधे सरकारकडून केला जात असून त्यासाठी गेल्या दोन महिन्यांत चार-पाच बैठकाही झाल्या. त्या बैठकांना एक बिल्डर आणि अधिकारी बसले होते. बिल्डरांकडून अधिकाऱयांना धमकावण्याचा प्रयत्नही होतो, असा गौप्यस्पह्टही या वेळी आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी या मुद्दय़ावरून भाजपवरही निशाणा साधला. रेसकोर्स हलवून मुलुंडला एका खासगी बिल्डरच्या जागेत नेण्याचा प्रयत्न मागच्या वर्षीही खोके सरकारकडून झाला होता. त्या वेळी आम्ही विरोध केला तेव्हा भाजपनेही सुरात सूर मिसळण्याचे नाटक केले होते. मग आता त्यासाठी बैठका झाल्या, फक्त करार होण्याचे बाकी आहे, आता भाजप काय भूमिका घेणार, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.
आरडब्लूआयटीसीशी आमचा संबंध नाही. रेसकोर्सच्या जागेवर त्यांनी रेसिंग करावे किंवा करू नये हा त्यांचा प्रश्न आहे, पण मुंबईची 226 एकर जागा बिल्डरांच्या घशात घालायला देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. हिंमत असेल तर खोके सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवर येऊन सांगावे की सरकार त्या जमिनीला हात लावणार नाही, असे आव्हानही त्यांनी दिले.
कोणत्याही देवदेवतेवरून वाद होऊ नयेत
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दलही माध्यमांनी आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर श्रीराम असतील किंवा सर्वच देवदेवता असतील त्यावरून वाद होता कामा नयेत, भूतकाळात झालेल्या गोष्टींवरून वाद न घालता भविष्यासाठी लढायला हवे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
माझ्या पत्रातला एकतरी मुद्दा सत्ताधाऱयांनी खोडून दाखवावा
आदित्य ठाकरे यांनी बुधवारी महाराष्ट्रवासीयांना उद्देशून एक पत्र लिहिले होते. त्या पत्रावरून आज भाजपकडून टीका झाली. भाजपा नेते आशीष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कामांमुळे प्रदूषण झाल्याचा आरोप केला. त्याबद्दल माध्यमांनी विचारले असता, त्या पत्रातील मुद्दय़ांचे राज्यभरातील तरुणांनी आणि नागरिकांनी स्वागत केले असून सत्ताधाऱयांनी आपल्या त्या पत्रातला एकतरी मुद्दा खोडून दाखवा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.
सेल्फी नक्की काढू, आधी झालेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करा
अनेक प्रकल्प पूर्ण होऊनही केवळ पंतप्रधांच्या तारखेसाठी त्यांचे उद्घाटन मिंधे सरकारने रखडवून ठेवले आहे. त्यावरूनही आदित्य ठाकरे यांनी या वेळी टीका केली. दिघा रेल्वे स्थानक आठ महिने तयार आहे. आम्ही त्यावर सेल्फी नक्की काढू, पण ते सुरू व्हावे, असा टोला त्यांनी लगावला. उरण लाईन खुली करावी, डोंबिवली-माणकोली कनेक्टर तयार आहे त्याची सुरुवात करून नागरिकांना त्यांचा लाभ घेऊ द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
वरळी डेअरीत बुलेट ट्रेनचे तिकीट स्टेशन बनवा
जे प्रकल्प राज्यात येऊ शकले असते ते बाहेर पाठवले गेले. वरळी डेअरीही बिल्डरांच्या घशात जाणार आहे. तिथे कमर्शियल हब बनवणार आहेत. पण त्यात कार्यालये कुणाची बनवणार, सरकार तर सर्वच उद्योग गुजरातला हलवतेय, असा सवाल करतानाच त्यापेक्षा तिथे बुलेट ट्रेनचे तिकीट स्टेशन काढा, अशी खिल्ली आदित्य ठाकरे यांनी उडवली.
दाढी बदलायला पाहिजे
आदित्य ठाकरे यांच्या चकचकीत क्लीन शेव्हने आज सर्वांचेच लक्ष वेधले. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना त्याबाबत प्रश्नही विचारला. त्यावर दाढी बदलायला पाहिजे, असे उत्तर त्यांनी दिले. तो प्रश्न नक्की कोणत्या दाढीबद्दल होता याचा अंदाज येताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.