महाराष्ट्रात भाजप पुन्हा जिंकणार नाही! आदित्य ठाकरे यांचा विश्वास, मतदारांचे मानले आभार

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसोबत मिंधे, गद्दार, चोर यांच्यासह ईडी आणि सीबीआयसारखे मित्र होते, तरी पण राज्यात ते नऊवरच थांबले. तेही नऊवर आणि आपणही नऊवर, हीच महाराष्ट्राची खरी ताकद आहे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता शेतकऱयांसाठी आणि महिलांसाठी कितीही घोषणांचा पाऊस पाडला तरी महाराष्ट्रात भाजप पुन्हा जिंकणार नाही, असा विश्वास शिवसेना नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वाशी येथील एका कार्यक्रमात व्यक्त केला. यावेळी त्यांनी मतदारांचे आभारही मानले.

पाटण विधानसभा क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरात नोकरी आणि व्यवसायानिमित्ताने आलेल्या रहिवाशांचा मेळावा आज सायंकाळी वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि मिंधे गटावर सडकून टीका केली. या देशात कोणाची मस्ती चालत नाही, जनता कोणालाही डोक्यावर बसू देत नाही, हुकूमशाहीला थारा मिळत नाही हे मतदारांनी लोकसभा निवडणुकीतून भाजपला दाखवून दिले आहे. 400 पारचा नारा देणाऱयांना जनतेने 240 वर आणून बसवले आहे. भाजप या निवडणुकीत जिंकली नसून हरली आहे. संविधान बदलण्याचा त्यांचा डाव शिवसेना, इंडिया आघाडीने उधळून लावला आहे, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. याप्रसंगी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम, एम. के. मढवी, पाटण तालुकाप्रमुख सुरेश पाटील, माजी विरोधी पक्षनेते विजयानंद माने आदी उपस्थित होते.

त्यांना जेलमध्ये बसवणारच

राज्यात सध्या पोलीस भरती सुरू आहे. 17 हजार पदांसाठी साडेसतरा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. राज्यातील उद्योग गुजरातने पळवल्यामुळे बेकारी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. या घटनाबाह्य सरकारचे दिवस आता भरत आले आहेत. राज्यातील उद्योग बाहेर पळवून लावणाऱया मिंध्यांना आता सत्तेतून बाहेर पळवण्याची वेळ आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राला लुटणाऱयांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.

उद्योग गुजरातला पळवण्यासाठी भाजपने शिवसेना फोडली

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना एकही उद्योग गुजरातला गेला नाही. उद्योग गुजरातला पळवण्यासाठीच भाजपने शिवसेना फोडली, पण त्यांना हे माहिती नव्हते महाराष्ट्र कधीच संपत नाही तर संपवतो. त्यांनी आमचे 13 खासदार फोडले, मात्र महाराष्ट्राने आता त्यांचे 14 पाडले आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप अणि गद्दार सपाटून मार खाणार आहेत, असे ताशेरे यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांनी ओढले.