श्रेय घेण्यासाठी भाजपने टँकर चालक असोसिएशनचा संप दोन दिवस चिघळत ठेवून मुंबईकरांना वेठीस धरलं – आदित्य ठाकरे

मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. यातच पालिकेने लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह टँकर चालकांच्या संपावर बैठकीत तोडगा निघाला. यानंतर टँकर असोसिएशनने संप मागे घेतला. श्रेय घेण्यासाठी भाजपने टँकर चालक असोसिएशनचा संप दोन दिवस चिघळत ठेवून मुंबईकरांना वेठीस धरलं, असं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्यांनी X वर एक पोस्ट करत ही टीका केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिलेल्या मोर्चाच्या हाकेनंतर आज शेवटी मुंबईच्या आयुक्तांनी टॅंकर असोसिएशनला हमी दिली आणि संप मागे घेतला गेला, पण तरीही काही प्रश्न उरतातच.”

आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न

  • वारंवार टॅंकर असोसिएशन कडून दिल्या गेलेल्या इशाऱ्यांनंतरही व गेल्या आठवड्यात सुरु झालेल्या संपानंतरही आजवर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं नियंत्रण असलेली मुंबई महानगरपालिका गप्प का होती?
  • महावीर जयंती, हनुमान जयंती आणि आंबेडकर जयंतीसारख्या सणांच्या दिवशी मुंबईकरांना मुद्दाम त्रास देण्यासाठीच ह्या संपाकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं का?
  • संप समाप्तीची घोषणा मुंबई महानगरपालिका मुख्यालयातून होण्याऐवजी भाजपा आमदाराच्या मंचावरुन होणं तर जास्त शंका निर्माण करणारं नाहीये का? जणू काही क्रेडिट घेण्यासाठी मुद्दाम संप 2 दिवस चिघळत ठेवून मुंबईकरांना वेठीस धरलं गेलं आणि मग श्रेय घेण्यासाठी नाटक केलं?

आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईकरांनी भाजपाचा हा डाव आणि मुंबईबद्दल असलेला आकस वेळीच ओळखावा. मुंबईकरांचं भलं करण्याऐवजी मुंबईकरांना वेठीस धरुन स्वतःचं राजकारण खेळण्याची यांची वृत्ती मुंबई आणि महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे.”