आम्ही बदल्याचे राजकारण करत नाही, महाराष्ट्राच्या विकासासाठी करतो! आदित्य ठाकरेंचं रोखठोक उत्तर

‘मिंधे गट आणि भाजप हे घाणेरडे राजकारण करण्यात गुंतले आहेत. पण आमचं तसं नाही. आम्ही बदला घेण्यासाठीचे राजकारण करत नाही. आम्ही इथे महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी आहोत’, असं म्हणत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी अगदी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली. आदित्य ठाकरे हे इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी रोखठोक उत्तरं दिली.

समोरून येणाऱ्या प्रश्नांना जबरदस्त आक्रमकरित्या आणि अगदी स्पष्टतेने आदित्य ठाकरेंनी उत्तरं दिली. बुलडोझर राज, एन्काउंटर यावरून प्रश्न विचारला असता, ‘आज देशात मुख्यप्रश्न आहे तो बेरोजगारीचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. एअर इंडियाच्या 600 जागांसाठी 25 हजाराहून अधिक तरुण देशभरातून आले होते. अशीच गोष्ट पोलीस हवालदार पदासाठी होती. 17 हजार जागांसाठी साडे सतरा लाखांहून अधिक लोकांचे अर्ज आले होते. त्यापैकी अनेकजण तर उच्चशिक्षित होते जे या पदाच्या परीक्षेसाठी अर्ज करत होते. ज्या पद्धतीने भाजपने महाराष्ट्राला लूटलं आहे, त्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. बुलडोझर राज, एन्काउंटर हे शब्द वृत्तवाहिन्यांना टीआरपी देत असतील. मात्र लोकसभेवेळच्या मतदानावर लक्ष टाका, तुम्हाला दिसेल की देशातील नागरिकांनी हुकूमशाही नाकारत, आम्हाला नोकऱ्या द्या, आमचा आत्मसन्मान द्या अशी मागणी करत मतदान केल्याचं दिसतं’, असं जोर देऊन सांगितलं.

लोकसभा निवडणुकीतील सरासरी आकडेवारीवरून आदित्य ठाकरे म्हणाले की, आकडेवारीचं म्हणाल तर भाजप महाराष्ट्रात वाढली कारण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी त्यांना आवश्यक असलेला पाठिंबा दिला. त्यामुळे आजही आमच्या मित्र पक्षांच्या झालेल्या प्रगतीबाबत आम्ही खूश आहोत. पण भाजप आणि आमची तुलना करत असल्यास आमचे आमदार, खासदार पळवले, पक्ष आणि चिन्ह चोरलं. ईडी, सीबीआयच्या जोरावर आमचे 40 आमदार, 12 खासदार पळवले असताना देखील आम्ही 9 जागा जिंकलो आहोत. तसेच ठाणे, डोंबिवली, कल्याण अशी शहरं जी बेकायदेशीर मुख्यमंत्र्या हाताखालील असताना देखील आम्हाला चांगली मतं मिळाली आहेत. याऊलट भाजप जे दावा करतात की जगातील सगळ्यात मोठा पक्ष, सर्वाधिक सदस्य असेलेला, सर्वाधिक इलेक्टोरल बाँड असलेला, निवडणूक आयोग, ईडी-सीबीआय असं सगळं असताना देखील भाजप 9 च जागा जिंकलं आहे. तेव्हा स्ट्राइक रेट ही एक वेगळी गोष्ट आहे. मात्र जिद्द, प्रामाणिकपणा, तत्त्व ज्यांच्यासाठी आम्ही लढत आहोत त्यात स्ट्राइक रेट आमचा कदाचित कमी झाला असेल पण आम्ही भाजप सारखं निवडणूक जिंकण्यासाठी त्यात कधीही तडजोड केलेली नाही’, असं खणखणीत शब्दात मांडलं.

माझी लाडकी बहीण योजनावर बोलताना आदित्य ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला. भाजपचा नेताच म्हणाला की निवडणूकीसाठी हा आमचा एक जुगाड आहे. त्यासोबतच जे 10 वर्षांपूर्वी 15 लाखाच्या बाता करत होत ते आता 1500 वर आले? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. तसेच लाडकी बहीण सोबत आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे. शक्ती विधेयक आम्ही 2021 मध्ये मंजूर केलं होतं चार वर्षांपासून राष्ट्रपतींकडे अडकलेलं आहे. का त्यावर शिक्कामोर्तब केलं जात नाही? असं आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागणारे माजी राज्यपाल कोश्यारीजी त्यांनी का ते विधेयक पारित केलं नाही?, असं ते म्हणाले.

गद्दारांबाबत बोलताना ते म्हणाले की ज्यांना पक्षाने ओळख दिली, मोठं केलं ते गद्दार जे आमचे झाले नाहीत ते भाजपचे काय होणार, जनतेचे काय होणार, असाही प्रतिवाद त्यांनी केला.