शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी विधानभवनात गेले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू झालो आहोत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी निकालनंतर 48 तास उलटल्यानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरत नाही आणि पत्रकार विरोधी पक्षनेत्याबाबत विचारत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच मिंधे मुख्यमंत्री झाले तर जिंकलेले 133 जण काय करणार, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.
आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू झालो आहोत. प्रत्येकवेळी बोलायचे म्हणून काहीही बोलायचे याला काही अर्थ नसतो. त्यामुळे मिंधे गटाच्या नेत्यांनी आरोप करताना, टीका करताना मर्यादा आणि पातळी याचे भान ठेवावे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. जो काही घोळ करून त्यांनी विजय मिळवला आहे, त्याची मजा घ्या, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.
विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक पदसंख्या आणि विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करणार का, याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, योग्य वेळ आल्यावर आम्ही त्याबाबत बोलू आणि आमची भूमिका स्पष्ट करू. त्यावर आताच बोलणे योग्य होणार नाही. पत्रकार विरोधी पक्षनेत्याबाबत विचारत आहेत. मात्र, तुम्हा पत्रकारांना मुख्यमंत्री कोण हे समजले का, असा सवालही त्यांनी केला. निकाल जाहीर होऊन 48 तास उलटल्यानंतरही त्यांचा निर्णय होत नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होईपर्यंत मिंध्यांना मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी काही जणांनी केली आहे, असे पत्रकारांनी सांगितले. त्यावर ज्यांचे 133 आमदार निवडून आले आहेत, ते काय करणार? गेल्या अडीच वर्षात काहीही मिळाले नाही, तसेच बसणार का? तसेच हे 133 कोणत्या मतांना निवडून आले आहेत, तेदेखील जनतेला समजणे गरजेचे आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.