आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत डॉ. राहुल पाटील यांची उमेदवारी दाखल

महाविकास आघाडीचे परभणी विधानसभा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत रॅली काढून अफाट जनसमुदायाच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील हे तिसर्‍यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित राहिले. शनिवार बाजार मैदान येथून शक्तिप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे येताच घोषणाबाजी करत रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीत खासदार संजय जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार या मार्गे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मैदान येथे आल्यानंतर या ठिकाणी रॅलीचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना खासदार संजय जाधव म्हणाले जिथं कमी आहे तिथं आम्ही. आमदार पाटील हे १ लाखाच्या मताधिक्याने आघाडी घेणार आहेत. ज्या पक्षाची उमेदवारी आयात उमेदवाराने घेतली, त्या पक्षाचे मतदानच नाही. ज्यांनी आमचा पक्ष चोरला त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा घणाघात केला.

यावेळी बोलताना खासदार डॉ. फौजिया खान यांनी सांगितले, सध्या कायद्याचे राज्य नाही, गुंडांचे राज्य आहे. दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. मंत्रालयात केवळ कंत्राटदार दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस हे केवळ पक्ष फोडाफोडी करण्यात मग्न आहेत. आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे, असे सांगत आमदार डॉ. पाटील यांना केलेली विकासकामे, आरोग्य सेवा, महिलांसाठी रोजगार, मेडिकल कॉलेज पाहून सर्वसामान्य जनता आमदार राहुल पाटील यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजय गव्हाणे महायुतीवर टीका करताना म्हणाले की, ‘परभणी मतदारसंघात एक हाफ उभा आहे, त्या बेभरोसेचा निकाल कायमचा लावायचा आहे.’

यावेळी बोलताना आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले, आजच्या रॅलीत उपस्थित जनसमुदाय… एवढ प्रेम, घट्ट साथ पाहून मी भारावलो आहे. आम्हाला मुख्यमंत्री तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देतात. परंतु आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. एकवेळ अशी येईल की, आम्ही मंत्रालयात बसू आणि तुम्ही तुरुंगात असाल. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाहीत. अशा शब्दात आमदार डॉ. पाटील यांनी महायुतीला फटकारले. यांना साधा उमेदवार मिळाला नाही. जो उमेदवार दिला त्याची माझ्यासमोर उभे राहण्याची लायकी नाही, जनतेची सेवा करावी लागते, नुसतं सोशल मीडियावर गप्पा जमत नाही, ही जनता डॉ. राहुल पाटलांच्या कुटुंबातील आहे. तुमच्यासारखं पैसे देऊन येथे आणलेली जनता नाही. कोणीही किती आटापिटा केला तरी परभणीची जनता त्यांना जागा दाखवणार आहे, अशा शब्दात टीका केली. यावेळी शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, संतोष बोबडे, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, कॉंग्रेस नेते नदीम इनामदार, इरफानूर रहेमान खान यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.