कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजनेशिवाय बीडीडीतील इमारतीचे पाडकाम का केले? आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुंबईतील बीडीडी चाळींचा म्हाडातर्फे पुनर्विकास करण्यात येणार आहे. आता बीडीडीमधील इमारत क्रमांक 90 पाडण्यात आली. यावेळी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. या गंभीर समस्येकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. तसेच कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजनेशिवाय हे पाडकाम कसे करण्यात आले, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येत लक्ष घालावे. तसेच म्हाडाच्या या अयोग्य व्यवस्थेची तसेच सुरक्षेच्या यंत्रणेची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या गंभीर समस्येकडे आपले लक्ष वेधत आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. हे राजकारणाच्या पलीकडे आहे आणि सामान्य माणसाच्या सुरक्षेबद्दल आहे, पाडकाम करणाऱ्या कंत्राटदारांच्या बेजबाबदार वर्तनाविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

याबाबत एक्सवर आदित्य ठाकरे यांनी पोस्ट करत पाडकामाचे फोटोही शेअर केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आज वरळी बीडीडी इमारत क्रमांक 90 पाडण्यात आली. म्हाडाने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून ही पाडकाम करण्यात आले. या पाडकामावेळी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. याबाबत स्थानिकांनी तक्रार केली आहे. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले. मात्र, त्यांचे ऐकण्यात आले नाही. सुरक्षा उपाययोजनांशिवाय इमारत पाडल्यानंतर आता बॅरिकेड्स उभारले जात आहेत. असे का करण्यात आले, असा सवाल त्यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी यात लक्ष घावे अशी मागणी केली आहे.