
अमेरिकेने जगावर सर्वच देशांवर लादलेल्या टॅरिफची विविध देशांमध्ये चर्चा होत आहे. प्रत्येक देशाने त्यांच्या संसदेत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी याबाबतची रणनीतीही आखली आहे. मात्र, आपल्या देशात या मुद्द्यावर मोदी सरकारकडून मौन पाळण्यात आले आहे. त्यांनी याबाबतची माहिती जनतेला दिलेली नाही. तसेच देशावर होणाऱ्या परिणामांना आपण कसे सामोरे जाणार आहोत, याबाबतही काही सांगण्यात येत नाही. आपल्या देशातील संसदेत यावर चर्चा का होत नाही, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
या महत्त्वाच्या मुद्द्यावर भाजपच्या एकाही मंत्र्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. इतर सर्व देश त्यांच्या संसदेत त्यावर चर्चा करत आहेत. मात्र, आपल्या देशात यावर मौन बाळगले जात आहे. या टॅरिफचा आपल्या अर्थव्यवस्थेला, नोकऱ्यांना आणि व्यापाराला मोठा फटका बसेल. मात्र, हे शुल्क इतर देशांच्या तुलनेत कमी आहेत, असा अपप्रचार भाजपकडून करण्यात येत आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रेट अमेरिकाचा नारा देत जगभरातील 100 देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली. यातच हिंदुस्थानावरही ट्रम्प सरकारने 26 टक्के टॅरिफ लादला आहे. यावरूनच आदित्य ठाकरे यांनी इस्टाग्रम स्टोरीवर हा मुद्दा अधोरेखीत केला आहे. अमेरिकेच्या टॅरिफवर बहुतेक देश त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणि देशावर त्याचा कसा परिणाम होईल यावर चर्चा करत आहेत. पण हिंदुस्थानातील केंद्रीय सरकारने जनतेला वेगळ्याच मुद्द्यात गुंतवले आहे. भाजप सरकारची रणनीती वाद निर्माण करून देशाचे विभाजन करण्याची असल्याची टीका त्यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, अमेरिकेने लादलेल्या टॅरिफ सारख्या या राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यावर अर्थमंत्र्यांनी संसदेत सविस्तर निवेदन देणं अपेक्षित आहे. या टॅरिफचा हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि त्याला सामोरे जाण्यासाठी सरकारची योजना काय आहे, हे जनतेला कळायला हवं. संसदेत सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसह चर्चा आयोजित करून त्यांचं मत जाणून घेणं आणि सर्वांचं समर्थन मिळवणं गरजेचं आहे. पण भाजप सरकारने या राष्ट्रीय आव्हानाकडे पूर्णपणं दुर्लक्ष केलं आहे आणि त्याचे व्यवस्थापन अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.