मिहीर शहाला अटक करण्यासाठी 60 तास का लागले? गृहमंत्री गप्प का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला अखेर तीन दिवसांनी अटक झाली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. पण घटना होऊन 60 झाले. त्यानंतर मिहीर शहाला अटक झाल्याने संशय व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणी शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केला. मिहीर शहा याला अटक झाली. पण या प्रकरणात काही लपवण्याचा प्रयत्न होतोय का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. गृहमंत्री आणि गृहखात्याच्या भूमिकेवरही आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरे यांनी हे प्रकरण विधानसभेतही उपस्थित केले. या प्रकरणात पीडित कुटुंबाला राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.

वरळीतील हिट अँड रन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण हिट अँड रन तर आहेत. पण सीसीटीव्ही फुटेजसह पोलीस तपासात बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. फरफट नेल्यानंतर पुन्हा एकदा कारचा चालक बदलला आणि पुन्हा त्यांना उडवलं गेलं. त्यामुळे हे हत्येचं प्रकरण आहे. हत्येचं प्रकरण समजूनच कारवाई केली पाहिजे. ही आमची मागणी असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

वरळीतील हिट अँड रन प्रकरणात हलगर्जीपणा झालेला आहे. कारण आरोपी मिहीर शहा हा साधरणपणे 60 तास लपला होता. कुठे आणि कसा लपला होता? सीसीटीव्हीत का दिसला नाही? का 60 तास पकडला गेला नाही? काही लपवण्याचा प्रयत्न होता का? कोण त्याला मदत करत होतं? यावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. वरळीतील हिट अँड रन प्रकरणी आम्ही आंदोलनाच्या तयारीत होतो. अखेर मिहीर शहाला अटक झाली आहे. पण फक्त हिट अँड रन प्रकरणी कारवाई न करता हत्येचा गुन्हा मिहीर शहावर दाखल करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

वरळी असो, मुंबई असो की महाराष्ट्रात असो… अशा घटना घडत आहेत. मरिन ड्राईव्ह, वरळी सीफेस, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर राँग साईड ड्रायव्हिंग सुरू झालं आहे. ड्रंक ड्रायव्हिग वाढत चाललेलं आहे. ट्रॅफिक पोलीस नाक्यावर दिसत नाहीत. ते झाडाआड दिसतात. दुसऱ्या बाजूला एवढी मोठी घटना झाल्यावर तो मिहीर शहा पळून कसा गेला? हे कोणत्या देशात घडतं? आरोपीला पकडायला 60 तास लागतात? मग हेच जर उलटं घडलं असतं तर? पोलिसांनी कशी वागणूक दिली असती? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

मुंबई पोलीस खूप चांगलं काम करतात. दिवसरात्र मेहन घेतात. पण गृहखातं, गृह मंत्रालय आणि गृहमंत्री काय करत आहेत? ते का स्वतः उत्तर देत नाहीये. ते का उत्तर देत नाहीत? आम्ही काय निबंध लिहून घ्यायचा त्यांच्याकडून? बोचरा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.